देश
स्टॅन ली यांना राज ठाकरेंची कुंचल्यातून आदरांजली
स्पायडर मॅन, एक्स मेन, हल्क, आयर्न मॅन यांसारख्या सुपर हिरोंची निर्मिती करणाऱ्या स्टॅन ली यांनी आठवड्याभरापूर्वीच अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना कुंचल्यातून आदरांजली वाहिली आहे. मार्व्हल कॉमिक्सचं अद्भुत विश्व सांभाळणारे स्टॅन ली यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या स्मृतीस आदरांजली असे म्हणत राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र फेसबुक आणि ट्विटर पेजवर पोस्ट केले आहे.
या व्यंगचित्रात स्टॅन ली हे त्यांनी तयार केलेल्या सगळ्याच सुपरहिरोंचा निरोप घेत आहेत. ज्यामध्ये स्पायडर मॅन, हल्क आणि अनेक सुपरहिरो आहेत. स्टॅन ली त्यांच्या सूटमध्ये आहेत आणि आकाशात उड्डाण घेत आहेत असे हे व्यंगचित्र आहे. माझ्या सुपरहिरोंनो येतो मी माझ्या पृथ्वीला तुम्ही सांभाळा असे आवाहन स्टॅनली अखेरचे उड्डाण घेण्याआधी करत आहेत असेही या व्यंगचित्रात दिसते आहे.
राज ठाकरे हे जितके उत्तम राजकारणी आहेत तेवढेच उत्तम व्यंगचित्रकारही आहेत. त्यांच्या कुंचल्यातून ते अनेक व्यंगचित्रं साकारत असतात. दिवाळीत तर त्यांनी राजकीय परिस्थितीवर मतं मांडणारी व्यंगचित्रांची मालिकाच चालवली. आता स्टॅन ली यांच्यावर आधारीत असलेले हे व्यंगचित्रही तेवढेच बोलके आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र त्यांच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर पेजवर पोस्ट केले आहे.