मनोरंजन
2.0 movie release : नव्या विक्रमांसाठी ‘२.०’ सज्ज, पहाटेपासून चित्रपटगृह ‘हाऊसफुल्ल’!
भारतीय चित्रपटसृष्टीत बिग बजेटची संकल्पना बदलत अनेक चित्रपटांना टक्कर देण्यासाठी आता सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. एस. शंकर दिग्दर्शित ‘२.०’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस अखेर उजाडला असून, सर्वत्र थलैवाच्याच नावाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुख्य भूमिकेत असणाऱ्या रजनीकांत आणि खलनायकी भूमिकेत असणाऱ्या अक्षय कुमार यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
चित्रपटाच्या पहिल्या शो पासूनच चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. कुठे आतिषबाजी, कुठे पारंपरिक दाक्षिणात्य वाद्य अशा एकंदर वातावरणात चाहत्यांनी रजनीकांत यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.
खिलाडी कुमारची खलनायकी भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून अभिनेत्री एली अवराम हिसुद्धा झळकणार आहे. त्यामुळे स्टारकास्ट, तंत्रज्ञानाचा वापर आणि बजेट अशा सर्वचट गोष्टींची सुरेख घडी ‘२.०’ च्या निमित्ताने बसल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरही #2Point0 #2Point0FDFS #2Point0FromToday #Thalaivar असे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आले असून, त्याअंतर्गत प्रतेकजण आपल्या परिने या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आनंद व्यक्त करत असल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्य़ा फोटो आणि व्हिडिओंमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार चाहत्यांनी मंदिरामध्ये पूजा करत, नृत्य करत, ढोलताशे वाजवत आपल्या आवडत्या चित्रपटगृहाबाहेर आनंद साजरा केला. आनंद, उत्साह आणि कुतूहलपूर्ण वातावरणात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे आता बॉक्स ऑफिसवर कोणता विक्रम रचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.