देश
काँग्रेसला ‘हात’ न देण्याचे अखिलेश यादव यांचे संकेत
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी झाल्यास त्यात काँग्रेसला स्थान मिळणार का ? याविषयी संभ्रम अद्याप कायम आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारमध्ये समाजवादी पार्टीच्या एकमेव आमदाराला स्थान न मिळाल्यामुळे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव नाराज आहेत.
काँग्रेसने असे करुन महाआघाडीसाठी चांगला संदेश दिलेला नाही असे अखिलेश बुधवारी म्हणाले. मध्य प्रदेशात सपाच्या एक आणि बसपाच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आला. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांची आघाडीची रचना कशी असेल ? या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले की, मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळात आमच्या आमदाराचा समावेश न केल्याबद्दल मी काँग्रेसचे आभार मानतो. त्यांनी आमचा मार्ग अधिक सोपा केला आहे. उत्तर प्रदेशातील संभाव्य आघाडीत काँग्रेसला स्थान न देण्याचे त्यांनी यापूर्वी सुद्धा संकेत दिले आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या काँग्रेसने उत्तर प्रदेशची तयारी सुरु केली आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने सोबत घेतले नाही तर काँग्रेसला एकटयाने लोकसभेची निवडणूक लढवावी लागेल. त्यादृष्टीने काँग्रेसने आतापासूनच रणनिती आखायला सुरुवात केली आहे.सपा-बसप आघाडीमध्ये स्थान मिळाले नाही तरी पक्षाला कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.