Menu

देश
घडामोडींची किंमत मोजावी लागेल, मात्र विकासातून ती भरुन काढू -खा. गांधी

nobanner

नगरच्या महानगरपालिकेचा महापौर, उपमहापौर भाजपचा असावा, हे स्वप्न घेऊन आजपर्यंत आम्ही वाटचाल केली. या स्वप्नपूर्तीचे वर्णन शद्बात होणार नाही. उपमहापौरपद अनेकदा मिळाले. मात्र सापत्नतेमुळे विशेष काम करु शकलो नाही. आता दोन्ही पदे भाजपाकडे आहेत. यासाठी राष्ट्रवादी, बसप व अपक्षांनी सहकार्य केले. यामुळे नगर राज्यभर चर्चेत राहिले. झालेल्या घडामोडीची किंमत नक्कीच मोजावी लागेल. शहराच्या विकासात मोलाची भर घालून नक्कीच ही किंमत भरु न काढू, असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी केले.

नूतन महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांचा शहर भाजपाच्यावतीने पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला, त्या वेळी खा. गांधी बोलत होते. ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, पदाधिकारी किशोर बोरा, किशोर डागवाले, जगन्नाथ निंबाळकर, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, शिवाजी दहिंडे, नगरसेवक भैय्या गंधे, मनोज दुलम, रविंद्र बारस्कर, सोनाबाई शिंदे, भिंगार छावणी मंडळाच्या सदस्य शुभांगी साठे आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मनपा निवडणुकीत पक्षाच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले, याची खंत महापौर, उपमहापौरपद मिळाल्यामुळे भरु न निघाली. दोघांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या विकासाचे नवे पर्व आम्ही सुरु करणार आहोत. ज्या विकासाच्या अजेंडयावर राष्ट्रवादी, बसपने पाठिंबा दिला, तोच अजेंडा घेऊन पुढे जाणार आहोत, यासाठी सर्वाना बरोबर घेऊ, असे खा. गांधी या वेळी म्हणाले.

नूतन महापौर वाकळे म्हणाले, कार्यकर्त्यांंमुळेच मी महापौरपदापर्यंत पोहोचलो. ही जबाबदारी पार पाडणे सोपे नाही. एका व्यक्तीकडून कधीही मोठे काम होत नाही, त्यासाठी सर्वाचे सहकार्य लागते. खा. गांधी यांच्या सहकार्यामुळे या कामात काही कमी पडणार नाही. आतापर्यंत झालेल्या महापौरांपेक्षा वेगळे काम मला करायचे आहे. यासाठी मी सर्वाना बरोबर घेऊन काम करेन. उपमहापौर ढोणे म्हणाल्या, पद मिळाल्यानंतर झालेला हा सत्कार माहेरचा आहे. आम्ही जरी पदावर असलो तरीही पक्षाचे कार्यकर्तेच महापौर-उपमहापौर आहेत. शहराला आता विकासाच्या वाटेने न्यायचे आहे. सुनील रामदासी यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक सुवेंद्र गांधी यांनी केले. आभार दामोदर बठेजा यांनी मानले.