Menu

देश
छिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल

nobanner

श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढल्याने अहमनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला त्याचं पद गमवावं लागलं होतं. तसंच त्याला भाजपानेही पक्षाबाहेर हाकललं. या सगळ्या गोष्टी घडूनही अहमदगनर महापालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणारा छिंदम विजयी झाला. नुकत्याच झालेल्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांमध्ये छिंदम हा प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष म्हणून निवडून आला आहे.

श्रीपाद छिंदमची निवड झाल्याने लोक संताप व्यक्त करु लागले आहेत. महाराजांचा अपमान करणारा छिंदम निवडून येतोच कसा असे प्रश्न विचारले जात असून मत देणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त आहे. दरम्यान छिंदमची निवड रद्द करा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदमचा प्रतिस्पर्धी निलेश म्हसे यांनी ही याचिका केली आहे.

छिंदमविरोधात राष्ट्रवादीच्या अनिता राजेंद्र राठोड, शिवसेनेचे सुरेश रतनप्रसाद तिवारी, भाजपाचे प्रदीप परदेशी, मनसेचे पोपट भानुदास पाथरे, अपक्ष प्रवीण शाहूराज जोशी , अपक्ष निलेश सत्यवान म्हसे, अपक्ष अजयकुमार अरुण लयचेट्टी हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान छिंदमची पत्नी स्नेहा छिंदमने प्रभाग १३ मधून निवडणूक लढवली. मात्र तिचा पराभव झाला.

काही महिन्यांपूर्वी श्रीपाद छिंदमची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये श्रीपाद छिंदम नगरच्या उपमहापौरपदी असताना ठेकेदाराशी उर्मट भाषेत बोलत होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही त्याने अपशब्द काढले. ज्यामुळे भाजपावर टीकेचे ताशेरे झाडण्यात आले. त्यानंतर भाजपाने त्याला पक्षातून घरचा रस्ता दाखवला.

निवड झाल्यानंतर श्रीपाद छिंदमला उपरती आली आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे व राज्याचे आराध्यदैवत असून त्यांच्यासमोर मी नतमस्तक होऊन हा विजय स्वीकारला असल्याचे त्याने माध्यमांसमोर सांगितले.