देश
जोडप्याच्या हॉटेलमधील रुममध्ये डोकावताना वेटरला पकडलं
जोडप्याच्या रुममध्ये डोकावून पाहणाऱ्या एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या करोलबागमधील हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. राजी बाबू असे आरोपीचे नाव असून तो हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. रुममध्ये खेळती हवा जाण्यासाठी जी जागा असते तिथे उभा राहून आतमध्ये काय चालू आहे ते डोकावून पाहत होता.
रुममधल्या महिलेला व्हेंटिलेशनची जी जागा असते तिथे माणसाच्या आकृतीची हालचाल दिसली. तिने लगेच नवऱ्याला याची माहिती दिली. आग्र्याला राहणारे हे जोडपे इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करतात. दिल्लीत ते एका कामासाठी आले होते. करोल बागमधील काबिल हॉटेलमध्ये त्यांनी रुम बुक केली होती. गुरुवारी रात्री रुमच्या व्हेंटिलेशनच्या जवळ महिलेला हालचाल दिसून आली.
महिलेच्या नवऱ्याने जेव्हा उभे राहून पाहिले तेव्हा त्याला बाबू आतमध्ये डोकावताना दिसला. त्याने लगेच बाहेर जाऊन बाबूला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. राजी बाबू मूळचा बिहारचा असून मागच्या काहीवर्षांपासून तो या हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. त्याने काही व्हिडिओ वैगरे बनवला आहे का ? हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. याआधी सुद्धा त्याने असे प्रकार केले आहेत का ? याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी हॉटेलच्या मॅनजरची सुद्धा चौकशी केली.