देश
भूपेश बघेल छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री, काँग्रेसकडून घोषणा
दीर्घ प्रतिक्षेनंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असणारे भूपेश बघेल यांच्या हातीच राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कसरत करावी लागली. या दोन्ही राज्यांपेक्षा छत्तीसगडमधील नाव निश्चित करणे कठीण होते. कारण इथे दोन नव्हे तर चार-चार दावेदार होते. अखेर भूपेश बघेल यांनी बाजी मारली. बघेल यांच्याशिवाय टी एस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरणदास अनंत यांच्या नावाचीही चर्चा होती.
भूपेश बघेल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले भूपेश बघेल हे राजकारणातील आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ९० जागा असलेल्या छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसने ६८ जागांवर विजय मिळवला आहे. नव्या आमदारांचे नेतृत्व आता बघेल यांच्याकडे देण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकांपासून ते स्थानिक निवडणुकांसाठी त्यांनीच नियोजन केले आहे.
भूपेश बघेल पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी रमणसिंह सरकारसह काँग्रेसमधून फारकत घेतलेले अजित जोगी यांचाही सामना केला. कुर्मी क्षत्रिय परिवाराशी बघेल हे संबंधित आहेत. राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळवून देण्याची जबाबदारी दिली होती. ती मी पार पाडली, असे वक्तव्य त्यांनी निकालानंतर केले होते.
मध्य प्रदेशमधील दुर्ग (आता छत्तीसगड) मध्ये २३ ऑगस्ट १९६१ मध्ये बघेल यांचा जन्म झाला. त्यांनी ८० च्या दशकात काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली होती. दुर्ग जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. ते १९९० ते ९४ पर्यंत जिल्हा युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. १९९३ ते २००१ या कालावधीत ते मध्य प्रदेश गृहनिर्माण मंडळाचे निदेशक होते. २००० मध्ये जेव्हा छत्तीसगड वेगळे राज्य झाले तेव्हा ते पाटण मतदारसंघातून निवडून आले. याचदरम्यान ते कॅबिनेट मंत्रीही झाले. २००३ मध्ये काँग्रेस सत्तेतून बाहेर झाल्यानंतर भूपेश यांना विरोधी पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले. २०१४ मध्ये त्यांना छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले. तेव्हापासून बघेल हेच प्रदेशाध्यक्ष आहेत.