देश
राजीव गांधींच्या ‘भारतरत्न’वरुन आपमध्ये जुंपली, आमदार अलका लांबा देणार राजीनामा ?
शीखविरोधी दंगलीचा ठपका ठेवत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार परत घेण्याच्या ठरावावरुन आम आदमी पक्षात वाद निर्माण झाला आहे. दिल्ली विधानसभेत यासंदर्भातील ठराव मांडण्यात आल्यानंतर अलका लांबा यांनी सोशल मीडियावर यावरुन नाराजी व्यक्त केली. पक्षातील मतभेद उघड केल्याने पक्षनेतृत्वाने अलका लांबा यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता अलका लांबा देखील पक्ष सोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशात १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल उसळली होती, तो नरसंहार होता, त्यामुळे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना देण्यात आलेला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब परत घेण्यात यावा, असा ठराव शुक्रवारी दिल्ली विधानसभेत मंजूर करण्यात आला. आपचे आमदार जर्नेलसिंग यांनी हा ठराव मांडला, तो सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. देशामध्ये जो नरसंहार झाला त्यामध्ये ज्याचे नातेवाईक बळी पडले त्या कुटुंबांना अद्यापही न्याय मिळालेला नाही, असे दिल्ली सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयास लेखी स्वरूपात कळवावे, असेही ठरावामध्ये म्हटले आहे. मानवता आणि नरसंहार याविरुद्धच्या गुन्ह्य़ांचा भारताच्या अंतर्गत फौजदारी कायद्यात विशेष समावेश करण्यासाठी सर्व महत्त्वाची आणि आवश्यक ती पावले उचलण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, असा आदेश सभागृहाने सरकारला दिला.
दिल्ली विधानसभेतील या ठरावावरुन वाद निर्माण झाला आहे. चांदनी चौकमधून निवडून आलेल्या आपच्या आमदार अलका लांबा यांनी या ठरावाला विरोध दर्शवला. ठरावादरम्यान त्यांनी सभात्याग केला. सभागृहाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी या ठरावाचा उघडपणे विरोध केला. यानंतर पक्षनेतृत्वाने अलका लांबा यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली.’पक्षाने माझ्याकडे आमदारकीचा राजीनामा मागितला असून त्यांनी मला पक्षाच्या प्राथमिक सदस्यात्वाचाही राजीनामा द्यायला सांगितला आहे’, असे लांबा यांनी सांगितले. मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण मी शनिवारी सकाळी याबाबत निर्णय घेईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, मूळ ठरावात राजीव गांधींचा उल्लेख नव्हता. आमदार सोमनाथ भारती यांनी आयत्या वेळी ठरावात त्या दोन ओळींचा समावेश केला. तर आपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने सोमनाथ भारती आणि अलका लांबा या दोघांविरोधात शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमनाथ भारतींनी ठरावात बदल करण्यापूर्वी वरिष्ठांशी चर्चा करणे अपेक्षित होते. तर अलका लांबा यांनीही माध्यमांसमोर बोलण्याची घाई करायला नको हवी होती, असे आपमधील एका नेत्याने सांगितले.