देश
जुन्या ठाण्याचे नव्याने सीमांकन
रस्ते रुंदीकरणासाठी दुकाने, इमारतींसमोरील मोकळय़ा जागांचे संपादन; व्यापारीवर्गातून विरोध होण्याची शक्यता
लोकमान्य नगर, घोडबंदर, वागळे परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेणाऱ्या ठाणे महापालिकेने आता जुन्या ठाण्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणाकडेही लक्ष वळवले आहे. व्यापारी आणि राजकीय मंडळी यांच्या विरोधामुळे गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला जुन्या ठाण्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी प्रशासनाने नव्याने सीमांकन सुरू केले आहे. त्यामुळे गोखले मार्ग, राम मारूती मार्ग या भागांतील रस्त्यांलगतच्या इमारती व दुकानांसमोरील मोकळय़ा जागा रस्त्यासाठी ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेने गेल्या तीन वर्षांत शहरातील अनेक अरुंद रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली असून रेल्वे स्थानक परिसरातील काही रस्त्यांचे रुंदीकरणही पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय कॅडबरी जंक्शन ते शास्त्रीनगर, पोखरण रस्ता क्रमांक दोन, घोडबंदर भागातील काही रस्त्यांचे रुंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आणखी काही रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी बेकायदा बांधकामांवर हातोडा चालविण्याचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी एकीकडे वेगाने प्रयत्न सुरू असले, तरी जुन्या ठाण्यातील रस्ते रुंदीकरणाचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने राजकीय असहकारामुळे गेल्या दीड वर्षांपासून गुंडाळून ठेवला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारे महत्त्वाचे रस्ते अरुंद असल्याने जुन्या ठाण्यात प्रवेश करताच प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहराच्या वाहतुकीची धमनी मानला जाणारा गोखले रोड, राम मारुती रस्ता, खोपट तसेच उथळसर भागातील काही रस्त्यांचे रुंदीकरण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाने मत आहे. त्यासाठी काही विशेष नियमांच्या आधारे इमारती आणि दुकानांलगत असलेल्या मोकळ्या जागांचे (मार्जिनल स्पेस) संपादन करण्याचा निर्णय मध्यंतरी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला होता. त्यासाठी स्थायी समितीची विशेष मंजुरीही घेण्यात आली होती. मात्र याच काळात महापालिका निवडणुका जाहीर झाल्याने व्यापाऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता राजकीय वर्तुळातून या प्रकल्पासाठी आग्रह धरला गेला नाही.
मोबदल्याच्या मुद्दय़ावर विचार
जुन्या शहरातील काही रस्त्यांचे नव्याने सीमांकन केले जात आहे, अशी माहिती शहर विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली. किमान पाच रस्त्यांच्या रुंदीकरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी जागेचे संपादन करताना संबंधित दुकान मालक आणि इमारतीतील नागरी संस्थांना कोणता मोबदला देता येईल, याचाही विचार केला जात आहे. काही भागांत जागांचे संपादन आधीच करण्यात आले आहे. गोखले मार्ग तसेच राम मारुती मार्गावरील व्यापाऱ्यांचा यास अधिक विरोध होण्याची चिन्हे आहेत. त्यातून मार्ग काढण्यासंदर्भात विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.