देश
‘बेस्ट’ संपामुळे मुंबईकरांचे हाल!
रस्त्यावर रिक्षा-टॅक्सी चालकांची मनमानी दिसून येतेय. ‘बेस्ट’च्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू झालेत आणि त्याचाच फायदा रिक्षा चालक घेताना दिसत आहेत. ठिकठिकाणी रिक्षा चालक भाडी नाकारतायत तर काही जण प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारत आहेत. रिक्षा चालकांची मनमानी इतकी वाढली आहे की त्यांच्यापुढे वाहतूक पोलीसदेखील हतबल झालेले दिसून येत आहेत.
बेस्ट कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे प्रशासनाला ३ हजार २०० बसेस रद्द कराव्या लागल्यात.
‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस डेपो ओसाड पडलेले दिसत आहेत. या संपामुळे खोळंबलेले प्रवासी रिक्षा आणि टॅक्सीसाठी रांगा लावताना रस्त्यावर दिसत आहेत.
बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समिती यांच्यात दुपारी १२ वाजल्यानंतर बैठक आयोजित करण्यात आलीय. बेस्ट अध्यक्ष आशिष चेंबुरकर हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
चर्चा निष्फळ, कर्मचारी संपावर
बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यात झालेल्या बैठकीतील चर्चा ही पूर्णपणे निष्फळ ठरल्यामुळे अखेर बेस्टचे कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. सुमारे ३० हजार कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचं कळत आहे. ज्यामुळे बेस्टच्या जवळपास ३ हजार २०० बस या मुंबईच्या रस्त्यावर धावणार नाहीत परिणामी मुंबईकरांना या संपाचा मोठा फटका बसणार आहे.
संबंधित संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी एक बैठक बोलावली होती. पण या बैठकीला खुद्द महाव्यवस्थापकांचीच अनुपस्थिती अस्ल्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापकांनी ही बैठक घेतली. पण, अखेर या बैठकीचे समाधानकारक परिणाम मात्र समोर आले नाहीत.
बेस्ट अर्थसंकल्प हा महापालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात यावी याशिवाय इतरही प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
हा संप पाहता २५ लाख प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याचं चिन्हं आहे. पण, त्यासाठी प्रशासनाने नेमकी काय तयारी केली आहे, याची अद्याप माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे टॅक्सी, रेल्वे वाहतुकीवर याचा ताण येण्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी सुरू कराव्यात.
अनुकंपा तत्वावरील भरती सुरू करावी.
महापालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस मिळावा.
बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याबाबत प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात यावी.
‘बेस्ट’ची कामगारांना तंबी
‘औद्योगिक न्यायालयानं आपल्या ७ जानेवारी २०१९ च्या अंतरिम आदेशात ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली आहे, या आदेशाचा भंग केल्यास तो कोर्टाचा अवमान ठरेल’ असा बोर्ड बेस्ट बस डेपोच्या बाहेर लावण्यात आलेला आहे.
तसंच, हा संप मोडीत काढण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या ४ जानेवारी २०१९ च्या नियमानुसार, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम पुरवित असलेल्या सेवा या आपत्कालीन नियंत्रण अत्यावश्यक असल्यानं सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपास मनाई करण्यात
आलेली आहे. जे कर्मचारी संपात भाग घेतील ते कारवाईस पात्र ठरतील, असेही आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.
मुंबईकरांना दुप्पट मनस्ताप
दरम्यान, देशातील संघटीत व असंघटीत क्षेत्रातील व्यापक प्रमाणावर संघटीत झालेले सुमारे २५ कोटी कामगार आज आणि उद्या संपावर आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या देशव्यापी संपाचा निर्णय देशातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना व सर्व उद्योगातील देशपातळीवरील स्वतंत्र संघटनाच्या नवी दिल्ली येथे संयुक्त परिषदेत घेण्यात आला आहे. या रेल्वे, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, कोळसा उद्योग, पब्लिक सेक्टर, कारखाने, टॅक्सी, रिक्षा, म्युन्सिपल कामगार, फेरीवाले, माथाडी कामगार, अंगणवाडी महिला, या आणि इतर क्षेत्रातील कामगार संघटना आणि कामगार यात सहभागी होणार आहेत.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.