Menu

देश
बेस्ट संपावर तोडगा न निघाल्याने मनसे रस्त्यावर, बंद पाडलं कोस्टल रोडचं काम

nobanner

संपावर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे रस्त्यावर उतरली आहे. मनसेने कोस्टल रोडचं काम बंद पाडलं आहे. वरळी येथे सुरु असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी काम करणारे कर्मचारी तसंच तेथील सर्व मशीन्स हलवण्यास भाग पाडलं आहे. यासोबत तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या कार्यालयांना टाळं ठोकलं आहे. संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं सुरु करु देणार नाही असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी अकरा वाजता मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बेस्ट संपावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. बेस्ट संपाचा आज सातवा दिवस असून मुंबईकरांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. पालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. दरम्यान संपाबाबत दाखल याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकार उच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.

राज्य सरकारने याप्रश्नी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती नेमून त्याआधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उच्चस्तरीय समिती आणि कृती समितीमध्ये झालेल्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. संपाबाबत न्यायालय कोणते आदेश देते याकडे कामगार संघटनांसह सर्वाचेच लक्ष लागले आहे.

कामगारांचा वेतन करार, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आदी विविध मागण्यांसाठी गेल्या सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेस्टचे जवळपास ३० हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. पालिका आणि बेस्ट प्रशासन तसेच शिवसेनेच्या पातळीवर चर्चा झाल्यानंतरही या संपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.