देश
अफगाण युद्धातील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याचा अफगाण युद्धातील दहशतवादी अब्दुल रशीद गाझी हा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल हा जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. मसूद अझहरने अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्याविरोधातील कारवायांसाठी अब्दुल रशीदला तिथे पाठवले होते.
तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात चढवलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरचा विश्वासू साथीदार अब्दुल रशीद असल्याचे समोर आले आहे.
सुरक्षा दलांनी गेल्या काही महिन्यांमध्ये मसूद अझहरच्या पुतण्या आणि भाच्याचा चकमकीत खात्मा केला होता. ते दोघेही जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी आले होते. या दोघांच्या मृत्यूनंतर मसूदने त्याचा विश्वासू साथीदार अब्दुल रशीदला जम्मू- काश्मीरमध्ये पाठवले. जानेवारीमध्ये गुप्तचर यंत्रणांना यासंदर्भातील माहिती देखील मिळाली होती.
अब्दुल रशीद हा आयईडीद्वारे स्फोट घडवण्यासाठी ओळखला जातो. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्याविरोधात दहशतवादी कारवायासाठी मसूदने अब्दुल राशीदला तिथे पाठवले होते. सध्या अब्दुल हा जम्मू- काश्मीरमध्येच असल्याची माहिती देखील गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९ फेब्रुवारी रोजी संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरु याला फाशीची शिक्षा देऊन ९ वर्षे झाली. या दरम्यान मसूद अझहरने अब्दुल गाझीला काश्मीरमध्ये संदेश पाठवला होता. यात ‘काही तरी मोठं व्हायला हवं, हिंदुस्तान रडला पाहिजे’, अशा आशयाचा हा संदेश होता.
अब्दुल रशीद गाझी हा ‘जैश’च्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावरील प्रमुख देखील होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे तळ होते. जम्मू- काश्मीरमधील तरुणांना प्रशिक्षणासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेणे अशक्य झाल्यानेच गाझीला जम्मू- काश्मीरमध्ये पाठवण्याचा निर्णय मसूदने घेतला होता. गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी गाझीने दोन साथीदारांसोबत भारतात घुसखोरी केली होती. गुप्तचर यंत्रणांनी ‘जैश’च्या अफजल गुरु गटावरही करडी नजर ठेवली आहे. हल्ल्यानंतर ‘जैश’ समर्थकांच्या ‘टेलिग्राम’वरील ग्रुपवर ‘१०० हिंदूंची हत्या’ असा मेसेज आला होता. अफझल गुरु समर्थकांनी हा मेसेज पाठवला होता. या गटाचा हल्ल्याशी काही संबंध आहे का, याचा देखील तपास सुरु आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.