देश
आदिवासी शेतकऱ्याची ‘तिखट’ यशोगाथा
भाडेपट्टय़ाच्या जमिनीवर मिरचीचे भरघोस उत्पादन; महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न
हेमेंद्र पाटील, बोईसर
स्वमालकीची केवळ १० गुंठे जमीन असल्याने त्यात अधिक उत्पादनही घेता येत नव्हते आणि उत्पन्नही कमी मिळायचे. त्यामुळे पालघर जिल्ह्य़ातील बावडा येथील शेतकऱ्याने भाडेपट्टय़ावर सहा एकर शेतजमिनी घेऊन त्यावर मिरचीचे भरघोस उत्पादन घेतले. विविध प्रकारच्या मिरचीचे उत्पन्न घेऊन त्यांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद येथील बाजारपेठांमध्ये त्यांची मिरची विक्रीसाठी नेली जात आहे. स्वत: शेतात काम करून मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या या आदिवासी शेतकऱ्याने बागायती शेतीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
बावडा येथील नवापाडा येथे राहणारे आदिवासी शेतकरी किशोर कडू यांच्या मालकीची केवळ १० गुंठे शेतजमीन आहे. या शेतात त्यांनी २००९मध्ये चवळी पिकाची लागवड केली. उत्पादित केलेली चवळी पालघरच्या बाजारात विकून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. मात्र या शेतीतून अधिक उत्पादन येत नव्हते. २०१४मध्ये त्यांनी सहा एकर शेतजमीन भाडेपट्टय़ावर घेतली आणि तिथे बागायती शेती सुरू केली. इगल मिरची, शिमला मिरची, ज्वेलरी मिरची या बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी असलेल्या मिरचींची लागवड त्यांनी या शेतात केली. या शेतजमिनीसाठी त्यांना वर्षांला एकरी पाच हजार रुपये म्हणजे ३० हजार रुपये जमीनमालकाला द्यावे लागतात. या सहा एकरांत त्यांनी विविध प्रकारच्या मिरचीचे उत्पादन घेतले. कडू यांच्या शेताततून आठवडय़ाला शिमला मिरचीचे एक हजार किलो, ज्वेलरी मिरचीचे १२ दिवसांत १५०० किलो तर इगल मिरचीचे दररोज ३०० किलो उत्पादन घेतले जाते. त्यांना सहा एकर जागेवर मिरचीची लागवड करण्यासाठी वर्षांला आठ लाख रुपये खर्च येतो. मात्र त्यांना महिन्याला मिरचीतून दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. नोव्हेंबर ते जून या कालावधीत ते मिरचीचे उत्पादन घेतात.
नैसर्गिक खतांचा वापर
शेतीमध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला जातो. मात्र कडू यांनी रासायनिक खतांच्या वापराला फाटा देत शेतात गांडूळखत, शेणखत, गोमूत्र यांचा वापर केला. नैसर्गिक खताचा वापर केल्याने जमिनीची धूप कमी होऊन उत्पादन चांगले मिळते, असे कडू यांनी सांगितले. यापुढे भाडेपट्टय़ावर आणखी शेतजमीन घेणार असून इतरही उत्पादन घेणार असल्याचे कडू यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.