देश
कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका
मुलींची कौमार्य चाचणी अर्थात व्हर्जिनिटी टेस्ट ही अनिष्ट प्रथा महाराष्ट्राच्या विविध भागांत अजूनही सुरू असल्याचं अनेक घटनांमधून स्पष्टपणे समोर आलं होतं. परंतु, अशी कौमार्य चाचणी करणाऱ्यांना राज्य सरकारनं आता जोरदार दणकाच दिलाय. ‘कौमार्य चाचणी’ ही अनिष्ट प्रथा यापुढे ‘लैंगिक अत्याचार’ समजला जाणार आहे, अशी घोषणाच राज्य सरकारनं केलीय. या संदर्भात महिला अत्याचारविरोधी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला जाणार आहे. लवकरच यासंदर्भात अधिसूचना जारी करून राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांना त्याविषयी सूचित करण्यात येईल, असं गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी म्हटलंय.
गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली त्यात शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारानं जातपंचायतीविरोधी समिती सदस्य आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची जुनाट अत्याचारी रुढींबाबत बैठक झाली. ज्या जमाती स्त्रियांना अपमानजनक वागणूक देत असतील त्या संबंधितांवर कडक करण्याची मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. आता दर दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा केला जाणार आहे.