देश
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही मुलायमसिंह यादव यांची इच्छा
लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महाआघाडीने भाजपाविरोधात एल्गार पुकारला असतानाच समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत मोदींना दिलेल्या शुभेच्छा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत दिल्या आहेत. त्यामुळे या शुभेच्छांद्वारे महाआघाडीत फुट पडली की काय, यावर चर्चा रंगली आहे.
पाच वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाचा बुधवारी समारोप झाला. लोकसभेत ज्येष्ठ खासदारांनी सभागृहाला संबोधित केले. यात मुलायमसिंह यादव यांनी भाषणादरम्यान थेट मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्याच्या शुभेच्छाच दिल्या. मुलायमसिंह यादव यांनी आधी मोदींना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, या सभागृहात उपस्थित असलेले सर्व सदस्य निवडून यावे, अशी प्रार्थना मी करतो. सध्या आमची (विरोधी बाकांवरील खासदारांची) संख्या कमी आहे. आणि तुम्हीच पुन्हा पंतप्रधान व्हावे, असे त्यांनी मोदींना सांगितले. यावर सभागृहातील खासदारांना हसू आवरता आले नाही. मोदींनीही हात जोडून यादव यांचे आभार मानले.
मोदींनी त्यांच्या कार्यकाळात सर्वांना घेऊन पुढे जाण्याचे प्रयत्न केले आणि यात त्यांना यशही आले, असे त्यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे कामकाज व्यवस्थित पार पडावे, यासाठी मेहनत घेतली आणि यासाठीच मी त्यांचा देखील आभारी आहे, असे मुलायमसिंहांनी सांगितले. विशेष म्हणजे मुलायमसिंह यादव मोदींचे कौतुक करत असताना त्यांच्या शेजारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या देखील बसल्या होत्या.
एकीकडे संसदेबाहेर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी करत भाजपावर टीका केली आहे. तर दुसरीकडे संसदेत समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव हे संसदेत मोदींना शुभेच्छा देत असल्याने पक्षात मतभेद तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.