Menu

देश
प्रेक्षणीय, पण..!

nobanner

धनंजय रिसोडकर

पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत भारतीय मल्लखांबपटूंना व्यासपीठ मिळाले हे मान्य केले तरी या स्पर्धेमुळे मल्लखांब खेळाचा आणि खेळाडूंचा कितपत लाभ झाला, त्याचे उत्तर फारसे सकारात्मक नाही. वातानुकुलीत शामियान्यात चकचकीत आवरणात झालेल्या मल्लखांब स्पर्धेचे आयोजन प्रेक्षणीय होते, मात्र अनुकरणीय नव्हे. सध्याचे जग दिखाव्याला भुलते, अशा समजातून या खेळासाठी प्रदीर्घ काळ कष्ट घेतलेल्या आयोजकांनाच पुढे चुकीचे पायंडे पडू द्यायचे नसतील तर या आयोजनात भविष्यात आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता असल्याचे कटू वास्तव स्वीकारून पुढील आयोजनांचा विचार व्हायला हवा.

महिलांच्या पुरलेल्या मल्लखांबचे विजेतेपद पहिल्याच जागतिक स्पर्धेत भारताच्या हातून निसटले. जपानच्या एका अ‍ॅक्रोबॅटिक ‘पोल डान्सर’च्या आसपासदेखील भारतीय मुलींचा खेळ नव्हता. दोरीचा मल्लखांब हा भारतीय मुलीच करीत असल्याने त्यात त्यांचे श्रेष्ठत्व अपेक्षितच होते. तसेच भारतीय मुलांच्या पुरलेल्या मल्लखांब खेळाचा दर्जा पाहता, अन्य देशांमधील ‘पोल डान्सर’ मुले जर आपल्या मल्लखांब स्पर्धेमध्ये आली तर मुलांच्या पुरलेल्या मल्लखांबवरील वर्चस्वदेखील पाच-सात वर्षांमध्येच संपुष्टात येण्याचा धोका आहे, हा विचार या जागतिक मल्लखांब स्पर्धेने अधोरेखित केला.

या जागतिक स्पर्धेतील विदेशी खेळाडूंचा सहभाग १००पर्यंत अपेक्षित होता, परंतु तो आकडा २५-३०पर्यंत मर्यादित राहिला, हे वास्तव समजून घेण्यासारखे आहे. मात्र कोणताही खेळ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर बहरायला सुरुवात होते, तेव्हा त्यांची हीच स्थिती असते. क्रिकेटचा विस्तार हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झाला, परंतु ऑलिम्पिकची उंची या खेळाला अद्याप गाठता आलेली नाही. अगदी कबड्डीमध्येही सुरुवातीला हीच स्थिती सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात दिसून यायची.

जागतिक स्पर्धेमुळे मल्लखांबच्या विकासाकडे आशेने नक्कीच पाहता येईल. परंतु अंध मुली, वयोवृद्ध नागरिक मानवी मनोरे रचतात अशा चमत्कृतीपूर्ण सादरीकरणातून मल्लखांब खेळाचा प्रचार आणि प्रसार होईल, अशा भ्रमात राहणे हे आत्मरंजन ठरेल. या सर्व बाबी करताना स्पर्धेतील खेळाडूंच्या प्रदर्शनांच्या वेळेत केलेली हयगय, वेळापत्रकाचा बोजवारा या बाबी अयोग्य होत्या. विदेशी खेळाडूंना दिलेल्या वेळेऐवजी दोन ते तीन तासांनी सादरीकरणाची संधी मिळणे, हे आयोजनाला गालबोट लावणारे आणि चुकीचा संदेश देणारे होते.

गुणपद्धती चांगली

या स्पर्धेचे सगळ्यात मोठे यश म्हणजे त्यात खेळाडूंना गुण देण्याची अवलंबलेली पद्धती होती. या बाबतीतील नियोजन अत्यंत कौतुकास्पद होते. कोणताही घोळ न घालता, खेळाडूंचे गुण तात्काळ घोषित करणे, हे खेळाचा दर्जा उंचावणारे ठरले.

वास्तव आणि भविष्य

या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाच्या खेळाचे दर्शन उपस्थितांना झाले. पण त्यातील सर्व खेळाडू हे भारतातील अव्वल दर्जाचे खेळाडू होते का? तर निश्चित नाही. पडद्यामागे संघ निवडण्याची राष्ट्रीय संघटनेची मनमर्जी, आदल्या रात्रीपर्यंत भारतीय संघच स्पर्धेतून बाहेर पडण्यापर्यंतच्या हालचाली झाल्याचे कटू वास्तव आहे. भारताच्या संघातील मुला-मुलींनी (महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, तमिळनाडूमधील खेळाडूंची निवड) दाखवलेल्या कौशल्यपूर्ण खेळाने उपस्थितांची दाद मिळवली. पण मल्लखांबला जागतिक स्तरावर नेताना किमान दशकभर या खेळावर आपले वर्चस्व राहील, अशी अपेक्षा असेल तर त्यात खेळाडू आणि प्रशिक्षकांनी खूप नावीन्यपूर्ण प्रयोग, कठोर मेहनत घेण्याची गरज आहे, हेदेखील वास्तव आहे. अन्यथा, जागतिक स्तरावर हा खेळ पोहोचत असताना त्या खेळातील मक्तेदारी पुढील दशकातच संपुष्टात येण्याचा धोका नजरेआड करता येण्यासारखा नाही.

मल्लखांबला जागतिक स्पर्धेमुळे उत्तम व्यासपीठ मिळाले, असे म्हणता येईल. पण त्यापेक्षा जागतिक अजिंक्यपद किंवा मल्लखांबपटूंचे संमेलन होते, असे म्हणणे योग्य ठरेल. मल्लखांबची स्पर्धा काय असते, ते इतर देशांना कळाले. स्पर्धेच्या दर्जाबाबत मला या स्पर्धेतून अपेक्षाच नव्हती. मात्र भविष्यात अमेरिकेत अधिक चांगले आयोजन होऊन मल्लखांबच्या प्रसाराला हातभार लागेल, याबाबत मी आशावादी आहे.