Menu

देश
युतीमुळे अनेकांची स्वप्ने भंगली

nobanner

प्रकल्प उभारणीला स्थायी समितीत मंजुरी

नवी मुंबई दररोज ५० मेट्रिक टनापेक्षा जास्त राडारोडा निर्माण होत असून त्याची विल्हेवाट हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापासून विटा, रेती, खडीनिर्मिती प्रकल्पाचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. हा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीत ठेवला होता, याला मंजुरी मिळाली असून हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

शहरात मोकळ्या भूखंडावर पडणारा राडारोडा स्वच्छता अभियानात अडथळे निर्माण करीत आहेत. त्यामुळे पालिकेने शहरातील निर्माण होणारा राडारोडा एकाच जागेवर जमा करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विटा, रेती, खडीनिर्मितीचा प्रकल्प उभारणी व पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचा सात कोटींचा प्रस्ताव मंजुरीकरिता स्थायी समितीत आणला होता.

शहरात नित्याने नवीन बांधकामे सुरू आहेत. यामुळे मोठय़ा प्रमाणात राडारोडा निर्माण होत असतो. मात्र हा राडारोडा विल्हेवाट करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या भूखंडावर किंवा कांदळवनात सर्रास टाकला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असते. पालिकेच्या तीन वर्षांच्या आकडेवारीवरून शहरात दररोज २५ मेट्रिक टन राडारोडा निर्माण होतो, तर एक वर्षांच्या बांधकाम परवाना विभागाच्या नोंदीनुसार दररोज २८ मेट्रिक टन असा एकूण ५३ मेट्रिक टन राडारोडा निर्माण होत असतो. यासाठी पालिका तुर्भेतील डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूला असलेल्या ३४ एकर जमिनीपैकी ५ एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही मशीन प्रति तास २० टन राडारोडय़ावर प्रक्रिया करेल. या मशीनची दिवसाला १५० टनांपर्यंतच्या राडारोडय़ावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. तसेच यातून रेती, खडी तसेच स्लजपासून विटा बनविण्याचे नियोजन आहे.