देश
विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीचा प्रस्ताव
विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजप-शिवसेनेने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना दिला आहे. विधान परिषदेत बहुमत असल्याचा भाजप-शिवसेनेचा दावा असून डॉ. नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची मुदत संपल्यानंतर उपसभापतीपद रिक्त होते. या पदासाठी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने सभापतींकडे दिला असल्याचे अर्थमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यानुसार सभापतींकडून निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर होणे अपेक्षित आहे.
विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्येही आम्ही सभापतींकडे निवडणुकीची मागणी केली होती व त्यांनी निवडणूक घेण्यास होकार दिला असल्याची माहिती शिवसेना गटनेते अनिल परब यांनी दिली. विधान परिषदेत अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसकडे बहुमत होते व काँग्रेसकडे उपसभापतीपद होते. आता भाजप-शिवसेनेला बहुमताची खात्री असून उपसभापतीपद शिवसेनेला दिले जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले