देश
संपूर्ण देश सैन्यदलाच्या पाठीशी- शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय वायूसेनेच्या धैर्याला सलाम केला आहे. पाक व्याप्त काश्मीरमधून (पीओके) चालणाऱ्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय वायूसेनेला सलाम असे ट्विट पवार यांनी केले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला या सर्जिकल स्ट्राइकबाबत फोनवरून माहिती दिल्याचे पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. संपूर्ण देश या कारवाईच्या आणि सैन्यदलाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने मंगळवारी सांयकाळी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. याबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मला फोन आला होता. परंतु, मुंबई विमानतळ आज दिवसभरासाठी बंद आहे. याबाबत मी स्वराज यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी फोनवरूनच मला याची माहिती दिली. हे ऑपरेशन कसे झाले. किती वाजता झाले आणि एकंदर ऑपरेशन सुरू असतानाची परिस्थिती त्यांनी मला सांगितली. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करणे हाच या कारवाई मागचा हेतू होता. या कारवाईत २०० ते २५० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज स्वराज यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण देश या कारवाईच्या आणि सैन्यदलाच्या पाठीशी आहे.
सैन्यदलाला अशावेळी पूर्ण स्वातंत्र्य द्यावेच लागते. योग्य वेळ, योग्य ठिकाण याची खात्री झाल्यानंतर त्यावर कृती केली पाहिजे. त्यासाठी पुन्हा केंद्र सरकारला विनंती करा असे प्रकार नसतात. यापूर्वीही सैन्यदलाला अशा प्रकारचे स्वातंत्र्य होते, असेही त्यांनी नमूद केले.