देश
हार्दिक पंड्याच्या अडचणीत भर, भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्या अडचणीत भर पडली आहे. पंड्या, लोकेश आणि करण जोहर या तिघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबरमध्ये लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या हे दोघे ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी करण जोहरशी गप्पा मारताना महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानांमुळे वादही निर्माण झाला आणि दोघांनाही भारतीय संघातून काही काळासाठी वगळण्यात आले होते. या दोघांचे निलंबन मागे घेण्यात आले असतानाच आता त्यांच्या अडचणीत नवीन भर पडली आहे. हार्दिक, लोकेश आणि करण जोहर या तिघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
जोधपूरमधील सरेचा गावात राहणारे देवाराम मेघवाल यांनी महिलांसंदर्भात अश्लील विधान करणे, आयटी अॅक्ट आणि एससी- एसटी अॅक्ट या कलमांतर्गत लूनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कार्यक्रमात हार्दिक पंड्याने महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावरही अपलोड केले. हार्दिक पंड्यांने महापुरुषांचाही अपमान केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. हार्दिक पंड्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील अपमान केला असून यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. मेघवाल यांनी पोस्टाद्वारे पोलिसांकडे तक्रार अर्ज पाठवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता तपासाला सुरुवात केली आहे.