देश
गिरिराज सिंह यांच्याविरुद्ध लढणाऱ्या कन्हैयाकडे 28 तासांत 28 लाख गोळा
बिहार बेगूसराय लोकसभा जागेवर एक चांगली स्पर्धा बघायला मिळणार आहे. संपूर्ण देशाच्या नजरा या एका जागेवर लागल्या आहेत. कारण यामध्ये एकीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह आहेत तर दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआयचा उमेदवार कन्हैया कुमार यांच्यात लढत आहे. आरजेडीने बेगूसराय येथून तन्वीर हसन याला उमेदवार घोषित केले आहे. ही लढाई जिंकण्यासाठी कन्हैयाला वोट सोबत नोटांचीही गरज लागणार आहे. यासाठी त्याने जनतेला आवाहन देखील केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत त्याने अवघ्या 28 तासांत 28 लाख गोळा केले आहेत.
कन्हैयाने लोकसभा निवडणूकीसाठी ऑनलाईन माध्यमातून 70 लाखाची रक्कम गोळा करताना एक समांतर अभियान सुरू केले आहे. रविवारी सीपीआयच्या नेत्यांनी त्याच्या उमेदवारीची घोषणा केली. तसेच ही टक्कर पंतप्रधान मोदींचे उमेदवार गिरिराज सिंह यांच्यासोबत असल्याने साधन-संसाधनात आपण त्यांच्याशी स्पर्धा करु शकत नसल्याचे सीपीआयने यावेळी म्हटले. यासाठी लोकांकडून आर्थिक सहाय्या सोबत मत मागण्याचे अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान बेगूसराय मतदार संघ क्षेत्रातच असेल असे वाटले होते पण कन्हैयाने एक व्हिडीओ जारी करत हे ऑनलाईन फंड गोळा करण्याचे अभियान सुरू केले. याआधीही सीपीआयच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीत ‘नोट सोबत वोट’ हे अभियान राबवले आहे. प्रसिद्ध समाजवादी नेते मधु लिमये, जॉर्ज फर्नांडीस यांना लोकांनी वोट देखील दिले आणि नोट देखील दिल्या.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत बेगूसराय जागेवरून भाजपाला 39.72 टक्के वोट मिळाले. तर दुसऱ्या नंबरवर असलेल्या राजदला 34.31 टक्के वोट मिळाले होते. कन्हैया कुमारच्या सीपीआय पार्टीच्या उमेदवाराला 17.87 टक्के वोट मिळाले होते. बेगूसराय येथे पाऊणे पाच लाख भूमिहार मतदार असून ते परंपरागत भाजपाचे मतदार मानले जातात. तर 2.5 लाख मुस्लिम मतदार देखील इथे आहेत. गिरिराज सिंह आणि कन्हैया कुमार हे दोघेही भूमिहार आहेत. दुसरीकडे आरजेडीने मुस्लिम उमेदवार तन्वीर हसन यांना तिकिट दिले आहे. इथे यादव मतदारांची संख्याही मोठी आहे.