देश
जीमेल, ड्राइव्ह, मॅप्सच्या युझर्सला फटका; गुगलच्या सेवेत तांत्रिक अडचणी
जगप्रसिद्ध गुगल कंपनीच्या युझर्सला आज (बुधवार, १३ मार्च) सकाळपासून गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि गुगल मॅप्स या सेवांवर परिणाम झाल्याचे युझर्सचे म्हणणे आहे. जीमेलसंदर्भातील समस्या सोडवणाऱ्या पाश्चिमात्य देशांमधील अनेक वेबसाईट्सवर युझर्सने मागील काही तासांपासून गुगलच्या सेवा वापरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर #GoogleDown हा हॅशटॅग वापरून याबद्दलची माहिती दिली आहे.
गुगलने आपल्या सर्व्हिस वेबसाईटवर दिलेल्या एका परिपत्रकामध्ये आम्ही जीमेल वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भातील समस्यांचा तपास करत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात जीमेलच्या युझर्सला लवकरच सविस्तर महिती दिली जाईल असंही कंपनीने म्हटले आहे. गुगलचे अकाऊण्ट लॉगइन करता येत असले तरी मेसेज पाठवताना एरर येणे, मेल पोहचण्यास वेळ लागणे, मेल उघडण्यास वेळ लागणे तसेच अकाऊण्ट रिफ्रेश होण्यास वेळ लागण्यासारख्या समस्यांचा समाना करावा लागत आहे.
या तांत्रिक अडचणी येणाऱ्या जीमेलच्या युझर्सला मेल पाठवल्यावर एररचा मेसेज येत आहे. या मेसेजमध्ये तुमचा इमेल आत्ता पाठवता येणार नाही तुमचे नेटवर्क तपासून पाहा आणि पुन्हा प्रयत्न करा असं सांगितलं जात आहे. जीमेलबरोबरच गुगल ड्राइव्ह वापरणाऱ्यांनाही अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे गुगलने म्हटले आहे. याशिवाय गुगल मॅप्स वापरणाऱ्या काही युझर्सला अडचणी येत आहे. गुगल मॅप्सवर स्ट्रीट व्ह्यू पाहण्याचा प्रयत्न केला असता संपूर्ण स्क्रीन ब्लँक पडत असल्याची तक्रार युझर्सने केली आहे.
जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील युझर्सला टप्प्याटप्याने या समस्यांचा समाना करावा लागत असल्याचे दिसत आहे. अमेरिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेकांनी गुगल सेवांसंदर्भात तक्रार केली आहे. या गोंधळामागील कारण अद्याप गुगलने स्पष्ट केलेली नाही. तसेच ही अडचण किती काळ राहणार आहे यासंदर्भातही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.