देश
नऊ दिवसात तिसऱ्यांदा बालाकोट येथे जाण्यास पाकिस्तानचा प्रसारमाध्यमांना मज्जाव
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी होत होती. १४ फेब्रुवारीला पुलवामाचा हल्ला झाला. त्यानंतर बरोबर १२ दिवसांनी पहाटेच्या सुमारास भारतीय वायुदलाने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पाकिस्तानच्या कुरापतींना आणि पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र पाकिस्तानने सुरुवातीला असा काही हल्ला झालाच नाही असे म्हटले होते. आता मागील नऊ दिवसात तिसऱ्यांदा पाकिस्तानने बालाकोट येथे जाण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेलाही वायुदलाने उद्ध्वस्त केलेला मदरसा पाहण्यापासून रोखण्यात आले आहे.
खरंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आमचे काहीही नुकसान झाले नाही जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी हल्ल्याच्या जागी येऊन खुशाल खात्री करावी असे म्हटले होते. आता मात्र पाकिस्तानी लष्कराने प्रसारमाध्यमांना रोखल्याची माहिती समोर आली आहे. आता सुरक्षेचे कारण देत भारतीय वायुदलाने केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी जाण्यास प्रसारमाध्यमांना मज्जाव करण्यात आला आहे. नऊ दिवसात तिसऱ्यांदा पाकिस्तानने प्रसारमाध्यमांना रोखले आहे.
पाकिस्तानने आत्तापर्यंत त्यांनी तयार केलेल्या इमेजेस समोर आणल्या होत्या. भारताने कोणताही एअर स्ट्राईक केलेला नाही असेही स्पष्ट केले. मात्र ९ दिवसात तिसऱ्यांदा पत्रकारांना आणि प्रसारमाध्यमांना हल्ल्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आले आहे. एअर स्ट्राईक झाल्यानंतर लगेचच भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही माहिती दिली होती की एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अनेक दहशतवादी, ट्रेनर्स आणि सीनियर कमांडर मारले गेले आहेत. मात्र पाकिस्तानी लष्कराने हा दावा फेटाळला. आता मात्र पाकिस्तान लष्कराकडून प्रसारमाध्यमांना एअर स्ट्राईकच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जातो आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
पुलवामाचा बदला घेण्यासाठी जेव्हा भारताने बालाकोट येथे हवाई हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले त्यानंतर आमच्या कोणत्याही इमारतीचे काहीही नुकसान झालेले नाही, असे पाकिस्तान सरकारने सांगितले होते. आता त्या ठिकाणी जाण्यापासून प्रसारमाध्यमांना मज्जाव केला जातो आहे. सुरक्षेचे कारण देऊन रोखले जाते आहे. याचाच अर्थ वास्तव वेगळे आहे जे समोर येईल अशी भीती पाकला वाटते आहे.