Menu

देश
पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण?, राजकीय घडामोडींना वेग

nobanner

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा करण्याची तयारी सुरु केली असतानाच भाजपानेही मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गोव्यात पोहोचले असून सोमवारी पहाटेपर्यंत गडकरी यांनी गोव्यातील भाजपाचे आमदार आणि अन्य मित्रपक्षांच्या आमदारांशी चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. आता सोमवारी याबाबत पुन्हा एकदा बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यातील भाजपा सरकार देखील अडचणीत आले आहे. सर्वाधिक संख्याबळ असलेल्या काँग्रेसने शनिवारी गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र देऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. पर्रिकर यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या गोटात सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींनी वेग धरला आहे.

दुसरीकडे भाजपाकडूनही हालचाली सुरु आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या आमदारांची पणजीत बैठक झाली. पहाटेपर्यंत या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. भाजपाकडून प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांचे नावही चर्चेत आहे.

तर मगोपचे सुदीन ढवळीकर यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. मगोपने सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा दिला होता. ‘आम्ही बऱ्याचदा भाजपाला पाठिंबा दिला आहे. आता भाजपाने आम्हाला मुख्यमंत्रीपदावर संधी द्यावी’, अशी मागणी मगोपने केल्याचे विधानसभेतील उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले. मात्र, मगोपच्या मागणीशी भाजपा सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गोव्यातील सध्याचे संख्याबळ काय ?

पर्रिकर आणि डिसोझा या दोन भाजपा आमदारांचे निधन तसेच दोघांचा राजीनामा यामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेचे संख्याबळ ३६ वर आले आहे. त्यात काँग्रेसचे १४, तर भाजपचे १२ आमदार आहेत. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि मगोप यांचे प्रत्येकी तीन आमदार तसेच एक अपक्ष आमदार, राष्ट्रवादीचा एक आमदार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.