Menu

देश
पुणे रेल्वेमधील तपासणीत दररोज पाचशे फुकटे प्रवासी

nobanner

पुणे रेल्वेमध्ये फुकटय़ा प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्याची मोहीम तीव्र केली जात आहे. रेल्वेच्या आकडेवारीनुसार पुणे रेल्वेमध्ये दिवसाला सरासरी सुमारे पाचशे फुकटे प्रवासी तिकीट तपासणिसांना सापडत आहेत. तापसणीमध्ये सापडत असलेल्यांशिवाय न पकडल्या जाणाऱ्या फुकटय़ांची संख्याही मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे गाडय़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विभागातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानक असलेल्या पुणे स्थानकावर दररोज अडीचशे गाडय़ांची ये-जा असते. त्यात लांब पल्ल्याच्या गाडय़ांसह पुणे-लोणावळा उपनगरीय गाडय़ा त्याचप्रमाणे पुणे-दौंड, बारामती, कोल्हापूर, मिरज आदी मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडय़ांचाही समावेश आहे. गाडय़ा आणि प्रवाशांची संख्या वाढत असताना त्या तुलनेत मनुष्यबळाची संख्या नसल्याचे वास्तव आहे. तिकीट तपासणिसांची संख्या कमी असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ांनाही ते पुरेसे ठरत नाहीत. त्यामुळे उपनगरीय आणि पॅसेंजर गाडय़ांमध्ये रोजची तिकीट तपासणी केली जात नाही. त्याऐवजी एकाच दिवशी अचानकपणे व्यापक मोहीम राबविली जाते. त्यात मोठय़ा प्रमाणावर फुकटे प्रवासी सापडत आहेत.

पुणे रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे विभागातील पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, त्याचप्रमाणे मिरज-कोल्हापूर या मार्गावर सध्या तिकीट तपासणीची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या अकरा महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणीच्या दरम्यान ३ लाख चार हजार प्रकरणांमध्ये १४ कोटी ७० लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. त्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १ लाख ३८ हजारांपेक्षाही अधिक आहे. त्यांच्याकडून ७ कोटी ४८ लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत याच कालावधीत योग्य तिकीट नसणे, विनातिकीट व साहित्याचे तिकीट नसण्याच्या २ लाख ६१ हजार प्रकरणांमध्ये १३ कोटी ५६ लाख रुपयांच्या दंडाची वसुली झाली. त्यामुळे यंदा तिकीट तपासणीत सापडलेल्यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट आहे. पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

दंड न भरल्यास तुरुंगवास

फुकटय़ा प्रवाशांची संख्या वाढल्याने रेल्वेकडून सध्या तिकीट तपासणीच्या मोहिमेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे. विनातिकीट प्रवास करताना पकडल्यास तिकिटाच्या रकमेसह कमीत कमी २५० रुपये दंड त्याचप्रमाणे अनियमित प्रवासाच्या प्रकरणात तिकिटाचे भाडे किंवा तितकाच दंड आकारण्यात येत आहे. प्रवासासाठी निश्चित केलेल्या साहित्यापेक्षा अधिक वजनाचे साहित्य घेऊन प्रवास केल्यास प्रवाशांना सहापट दंडाची आकारणी केली जाईल. दंड न भरल्यास तुरुंगवासही भोगावा लागेल, असा स्पष्ट इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.