देश
भाजपात अडवाणी युगाचा अस्त ?
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात लालकृष्ण अडवाणी यांना स्थान मिळालेले नाही. लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर मतदार संघातून भाजपाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये अडवाणी यांच्या राजकीय पर्वाचा अस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह यांना स्थान मिळाले आहे. १९९८ पासून गांधीनगर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अडवाणी यांच्या ऐवजी भाजपाने या मतदार संघातून अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ९१ वर्षीय अडवाणी यांना सक्तीची निवृत्ती दिल्याची सुरू झाली आहे.
भारतीय जनता पक्षात पूर्वी अटल बिहारी वाजपेयींच्या खालोखाल अडवाणींचे स्थान होते. भाजपाच्या राजकीय प्रवासात अडवाणी यांचे मोलाचे योगदान होते. १९९१ मध्ये पहिल्यांदा गांधीनगरमधून निवडून आल्यानंतर अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. राम मंदिरसाठी त्यांनी ही रथ यात्रा काढली होती आणि या रथयात्रेने भारतीय राजकारणाची दिशा बदलली होती. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली आणि अडवाणी याचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.
लालकृष्ण अडवाणी यांनी स्वतः देखील यंदाची निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका घेतली होती, असे समजते. अडवाणी यांची त्यांचा मुलगा किंवा मुलगी यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा असल्याचे समजते. आता अडवाणी यांना दुसऱ्या मतदार संघातून उमेदवारी दिली जाते की त्यांच्या कुटुंबातून कोणाला संधी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अडवाणी यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास भाजपामध्ये अडवाणी युगाचा अस्त होईल. लालकृष्ण अडवाणींसह मुरली मनोहर जोशी यांना देखील यंदाच्या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.