Menu

देश
भारत-पाकिस्तानमध्ये उद्यापासून सुरु होणार ‘समझोता एक्सप्रेस’

nobanner

भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझोता एक्सप्रेसची सेवा उद्यापासून सुरु होणार आहे. दोन्ही देशांनी रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दिल्लीमधून पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस निघणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा निर्णय झाला आहे. तीन मार्चला भारतातून पाकिस्तानसाठी पहिली ट्रेन निघेल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

भारताने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस बंद केली होती. भारतातून रविवारी समझोता एक्सप्रेस पाकिस्तानला जाईल. त्यानंतर सोमवारी लाहोरहून हीच ट्रेन परतीच्या प्रवासाला निघेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच प्रयत्न सुरु आहेत. समझोता एक्सप्रेसची सेवा पूर्ववत होणे याला तणाव कमी करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणता येईल.

काय आहे समझोता एक्सप्रेसचा इतिहास
समझोता एक्सप्रेसच्या नियमित प्रवाशांसाठी पाकिस्तान सासर तर भारत माहेर अशी भावना आहे. थार एक्सप्रेस सुरु होण्यआधी समझोता एक्सप्रेसच भारत-पाकिस्तानला जोडणारे एकमेव रेल्वे कनेक्शन होते.

समझोता एक्सप्रेस चालू होऊन आज ४० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. २२ जुलै १९७६ रोजी समझोता एक्सप्रेस सुरु झाली. सुरुवातीला अमृतसर ते लाहोर या ४२ किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन धावायची. समझोता एक्सप्रेस दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे. ८० च्या दशकात पंजाबमधील वातावरण बिघडू लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेने अटारीमधून समझोता एक्सप्रेस बंद केली होती. आता ही ट्रेन अटारीपर्यंत जाते.

जेव्हा ही ट्रेन सुरु झाली तेव्हा दररोज या ट्रेनच्या फेऱ्या व्हायच्या. १९९४ पासून या ट्रेनच्या साप्ताहिक फेऱ्या सुरु झाल्या. पाकिस्तानात लाहोर आणि भारतात दिल्लीमध्ये या ट्रेनचा थांबा आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केल्यानंतर २००२ ते २००४ अशी दोन वर्ष समझोता एक्सप्रेस बंद करण्यात आली होती.

समझोता एक्सप्रेसला अनेकदा राजकारणासाठीही लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या नापाक कृत्यांमुळे अनेकदा ही ट्रेन बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी २००७ रोजी पानिपतमधील दिवाना स्टेशनजवळ समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाकिस्तानी नागरीकांची संख्या जास्त होती. स्वामी असीमानंद यांच्यावर या स्फोटासाठी कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर सबळ पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली.