Menu

देश
रात्री २ वाजता पार पडला गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा शपथविधी

nobanner

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असणाऱ्या मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. गोव्याला स्थिर सरकार देणाऱ्या पर्रिकर यांच्या पश्चात अखेर भाजपाच्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ देत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार त्यांच्या हाती सोपवला.

‘मी मनोहर पर्रिकरांइतकं काम नक्कीच करु शकत नाही. पण, गोवा राज्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचाच माझा प्रयत्न असेल’, असं सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर म्हटलं. आता जी कामं अपूर्ण आहेत, ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी, असल्याचा विश्वासही त्यांनी गोव्याच्या जनतेला दिला.

रात्री उशिरा पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षनेते सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षनेते विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. तर, मनोहर आजगावकर, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विश्वजित राणे, मिलिंद नाईक यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपा, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष आमदारांशी चर्चा करण्यात आली होती. ज्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पर्रिकरांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी नेमकी कोणाची निवड केली जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेललं होतं. अखेर पर्रिकरांच्या नाकटवर्तीयांपैकी एक समजल्या जाणाऱ्या सावंत यांची या पदी निवड करण्यात आली. 🌐