Menu

देश
अणुबॉम्बमध्ये नव्हे, संस्कृतीतच देशाला महासत्ता बनवण्याची क्षमता!

nobanner

कोणताही अणुबॉम्ब किंवा रॉकेट सायन्स देशाला महासत्ता करणार नाही, तर ती क्षमता फक्त भारतीय संस्कृतीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय नाटय़ अकादमीचे माजी संचालक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनी शनिवारी येथे केले.

भारतीय संस्कृतीचा संगीत हा मूलाधार आहे. येथील धर्माचे मूळ संगीत आहे. संगीतामुळे या देशाचा माणूस घडला आहे. संवेदनशील झाला आहे. हिंसक वृत्तीपासून दूर आहे, असे मतही प्रा. केंद्रे यांनी मांडले.

‘चतुरंग प्रतिष्ठान’चा संगीतोत्सव सुयोग मंगल कार्यालयात आयोजित केला होता. पं. दिनकर पणशीकर यांना म्हैसकर फाऊंडेशनपुरस्कृत ‘चतुरंग संगीत’ सन्मान आणि प्रियांका भिसे यांना ‘चतुरंग संगीत शिष्यवृती’ देऊन गौरवण्यात आले. पणशीकर यांना ७५ हजाराची पुंजी आणि सन्मानपत्र, तर भिसे यांना २५ हजाराची पुंजी आणि सन्मानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला पं. राम देशपांडे, म्हैसकर फाऊंडेशनच्या सुधा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

माणसाची घडण ही संगीतामधून होते. ज्या माणसाला संगीताची आवड नाही तो पशूच. परंतु पशूच्या जीवनातही संगीत यावे म्हणून त्याच्या गळ्यात घंटा बांधली जाते. निसर्ग, धर्मातही संगीत आहे. म्हणून धार्मिक कार्यात संगीताला अगम्य स्थान आहे. जेथे संगीत नाही तेथे हिंसक वृत्ती, दहशतवाद आहे. मराठी माणसात संगीत ठासून भरलेले असल्याने जगात त्याच्यासारखी संवेदनशीलता पाहण्यास मिळत नाही. महाराष्ट्राच्या समृद्धीचे बलस्थानही संगीतच आहे, असे विचार प्रा. केंद्रे यांनी मांडले. संगीताने भारलेली, अध्यात्म घेऊन फिरणारी माणसे चेहऱ्यावरील तेजाने तळपत असतात. अशी तेजपुंज असलेली पं. दिनकर पणशीकर यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे पुढे आणणे गरजेचे आहे. ते काम चतुरंगने केले याचे समाधान वाटते, अशा शब्दांत प्रा. केंद्रे यांनी चतुरंगच्या उपक्रमाचा गौरव केला.

भारतीय कलांचे सर्व प्रकार जगाच्या मंचावर नेले पाहिजेत. भारतीय संस्कृतीची बलस्थाने जगाला पटवून दिली पाहिजेत. हे साध्य करायचे असेल तर चतुरंगने कला, संगीतातील मातब्बर- गुणीजनांना व्यासपीठावर आणून त्यांना सन्मानित करावे. ही समृद्धी आणि संचितच भारताला महासत्ता करणार आहे, असा विश्वास केंद्रे यांनी व्यक्त केला.