देश
राज्यात उष्णतेची लाट, तापमान वाढण्याची शक्यता
सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तर पुण्यातही पारा ४२ डिग्रीपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमाना बरोबरच किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा वाढू लागला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याच हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याच आवाहनही पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुराग कश्यप केले आहे.
पुण्याचा पारा वाढला आणि वाढणार
उष्णतेच्या लाटे मुळे पुणेकर सुध्दा घामाघूम झाले आहेत. पुण्याचा पारा बुधवारी ४१.१ डिग्री सेल्सियस वर जाऊन पोहोचला. जे यावर्षीचं उच्चांकी तापमान होते. २४ एप्रिलला नोंदविण्यात आलेले तापमान गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक तापमान आहे. या आधी १० एप्रिल २०१० मध्ये तापमान ४१.५ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले होते
तर एप्रिल २००९ मध्ये आता ४१.७ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले होते. जे गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक तापमान आहे. मात्र जर उष्णतेची लाट तीव्र झाली तर हे रेकॉर्ड मोडीत निघत पुण्याचा पारा ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.
दरम्यान या वाढलेल्या उन्हापासून बचाव करण्यासाठी पुणेकरांची पावले आपोआप ज्युस सेंटर आणि रसवंती गृहांकडे वळताना दिसत आहेत. एवढेच नाही तर दुपारी बाहेर पडण्याचही पुणेकर टाळत आहेत.
विदर्भातील तापमानात मोठी वाढ
नागपूरसह पूर्ण विदर्भातील तापमानात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्यानुसार येत्या चार दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज असल्याने हवामान खात्यातर्फे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपुरात आता कडक उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. एप्रिल महिन्यात दोनदा तापमान ४४ अंशावर गेले होते. परंतु त्यानंतर पाउस व ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाली होती. त्यामुळे काही काळ नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता.