देश
विखेंकडून मुलाचा उघड प्रचार, कारवाई करणार का, राष्ट्रवादीचा काँग्रेसला सवाल
काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचे सुपुत्र नगरचे युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्याचे समन्वयक अंकुश काकडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
आघाडीच्या वतीने नगरमध्ये संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र विखे पाटील हे विरोधी पक्षाचे सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. हा गंभीर प्रकार असून यावर कारवाई करणार की नाही, असा सवाल पत्रातून केला आहे. युतीचा उमेदवार निवडून येईल असे विखे प्रसार माध्यमांसमोर सांगत आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नगर जिल्ह्याचा समन्वयक म्हणून मी विखेंवर कारवाईची मागणी करत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.