देश
हंडाभर पाण्यासाठी विंचू, सापांच्या दहशतीत रात्र..
विहिरींनी तळ गाठलेला.. नैसर्गिक झऱ्यांमुळे विहिरीच्या भिंतीतून काय तो ओलावा पाझरत आहे.. त्यातून डबक्यात जमा होणाऱ्या पाण्यावरच सारी मदार.. त्यामुळे डब्याला दोरी बांधून त्यातून पाणी काढण्यासाठी विहिरीच्या बांधावर, लगतच्या शेतावर साप, विंचूंच्या दहशतीत संपूर्ण रात्र काढणाऱ्या महिला.. मुंबईच्या वेशीवरील शहापूर तालुक्यातील आदिवासी पाडय़ांवरील हे भीषण चित्र दुष्काळाची दाहकता दर्शवते.
ठाणे जिल्ह्यतील शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी पाडे वर्षांनुवर्षे पाणीटंचाईचा सामना करत आहेत. ठाण्याला पाणीपुरवठा करणारी अनेक धरणे या भागात असली तरी येथील गाव-पाडे तहानलेलेच आहेत. गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा दुष्काळाची दाहकता अधिक आहे, असे ग्रामस्थ सांगतात. शहापुरातील सावर गावातील विहिरी जानेवारीपासूनच कोरडय़ा पडू लागल्या. त्यातील एका विहिरीच्या तळातील डबक्यात साचलेले पाणी मिळवण्यासाठी लांबलचक रांगा लागतात. डब्याला दोरी बांधून पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. कसूबाई आडाम ही महिला पहाटे चार वाजता रांगेत उभी राहिली. दुपारी १२ वाजता तिला पाणी उपसण्याची संधी मिळाली. कसूबाईसारख्या अनेक महिला हंडाभर पाण्यासाठी रात्रभर जागतात. पाणीटंचाई दूर करण्यासाठी दोन दिवसाआड टॅंकरने पाणी विहिरीत सोडले जात होते. मात्र, गेले काही दिवस येथे टँकर फिरकलेच नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला.
शहापुरातीलच वाशाळा भागातील चिंध्याची वाडी या आदिवासी पाडय़ावर तर त्याहून भीषण स्थिती आहे. सावर गावाप्रमाणेच विहिरीने तळ गाठला आहे. नैसर्गिक झऱ्यांमुळे विहिरीच्या कपारीतून झिरपणारे पाणी डबक्यांमध्ये साचते. हंडाभर पाण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागतात. पाणी उपसण्याचा क्रमांक येईपर्यंत वाट पाहण्यासाठी अनेक महिलांना रात्रभर विहिरीजवळ थांबावे लागते. इथे साप, विंचूचा दंश होण्याची भीती वाटते. मात्र, पाणी मिळवण्यासाठी दुसरा पर्यायच नसल्याचे महिला सांगतात.
पाणीपुरवठा योजना ठप्प
बिबटय़ाच्या तावडीतून बहिणीची सुटका करणाऱ्या हाली बरफ हिच्यामुळे शहापूर तालुक्यातील नांदगाव चर्चेत आले. या गावातील रहिवाशांना पाणी मिळावे, यासाठी एक योजना राबविण्यात आली. या योजनेत सौरपंपाद्वारे बोअरवेल किंवा विहिरीतील पाणी नळाद्वारे पोहोचविण्यात आले होते. त्यासाठी घरांबाहेर सार्वजनिक नळ बसविण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या नळांना पाणीच येत नसल्याचे चित्र आहे. अनेक गावांमध्ये या योजनेची अशीच स्थिती असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुसरवाडीमध्ये मात्र या सौरपंपाद्वारे विहिरीमध्ये पाणी सोडण्यात येते आणि त्यासाठी येथे विहिरीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे.