Menu

देश
डोहात बुडून वाघाचा संशयास्पद मृत्यू

nobanner

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत गुगमाल राष्ट्रीय उद्यानात पाण्याच्या डोहात बुडून वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी सकाळीच हा मृत्यू उघडकीस आला असताना मेळघाट प्रशासनाने मात्र ही बाब लपवून ठेवली. मेळघाटातील ढाकना परिसरात जिथून वाघांच्या शिकारीचे सत्र उघडकीस आले होते, तिथून जवळच ही घटना घडली.

गुगमाल राष्ट्रीय उद्यानात नैसर्गिक पाणवठा आहे. या पाणवठ्यात टी-३२ हा अंदाजे सात ते दहा वर्षांचा वाघ पाण्यात बुडून मृत पावल्याचे बुधवारी सकाळी लक्षात आले. वाघाचा मृतदेह फुगून पाण्यावर आला होता. पाणवठ्याच्या दगडांच्या कपारीवर वाघांच्या नखांचे ओरखडे होते. त्यामुळे पाण्याबाहेर पडण्यासाठी त्याने बराच प्रयत्न केला असावा. त्याची नखे झिजून तुटलेली होती. शरीराला दुर्गंध सुटायला लागला होता. हृदय फुगलेले होते आणि यकृत खराब झाले होते. घटनेची माहिती कळताच संबंधित वनाधिकारी व दोन्ही मानद वन्यजीव रक्षक तसेच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले. अतिशय उंच आणि मोठी शरीरयष्टी असलेल्या वाघाला तब्बल आठ जणांनी मिळून बाहेर काढले. या सर्व प्रक्रियेत सायंकाळ झाल्याने शवविच्छेदन गुरुवारी सकाळी सात वाजता करण्यात आले. त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण कळेल. मात्र प्राथमिक अंदाज बुडून मृत्यू पावल्याचा आहे. दरम्यान, वाघाचा मृत्यू संशयास्पद असल्याने आणि तो लपवून ठेवण्यात आल्याने त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार का, यावर प्रश्नचिन्ह आहे.