अपराध समाचार
दुर्दैवी ! उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडिलांचा मुलगा आणि पुतण्यासह बुडून मृत्यू
- 259 Views
- May 21, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on दुर्दैवी ! उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडिलांचा मुलगा आणि पुतण्यासह बुडून मृत्यू
- Edit
उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एकजण बचावला आहे. घटना घडली तेव्हा संबंधितांचे कुटुंबीयही तेथे उपस्थित होते.
जनार्दन संभाजी पांचाळ (वय ४४ वर्षे), रोशन जनार्दन पांचाळ (१४) आणि ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मृतांची नावे आहेत. प्रसाद पांचाळ (२०) हा या दुर्घटनेतून बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जनार्दन हे बालपणापासून मुंबईत वास्तव्याला असून महापालिकेच्या शाळेत शिक्षक आहेत. पत्नी आणि मुलासह त्यांचे कायमचे वास्तव्य मुंबईत आहे. पण मूळ घर आंबवली सुतारवाडीत आहे. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात काही दिवस ते या घरात सुट्टीनिमित्त येतात. त्यानुसार सुमारे १५ दिवसांपूर्वी हे कुटुंब आंबवलीत सुट्टीसाठी आले होते. सोमवारी सकाळी जनार्दन त्यांची पत्नी, मुलगा आणि दोन पुतण्यांसह चंद्रेश्वर येथे गेले होते. सप्तलिंगी नदीत आंघोळ करून मग देवदर्शन करून घरी परतण्याचा त्यांचा बेत होता. सुमारे अर्धा तास नदीत डुबक्या मारल्यावर याठिकाणी असलेल्या खोल डोहाचा त्यांना अंदाज आला नाही. यातच जनार्दन, रोशन, ओंकार आणि प्रसाद पाण्यात ओढले गेले.
आपण बुडत आहोत, याची कल्पना येताच सर्वांनी आरडाओरड सुरू केली. याचदरम्यान काठावर बसलेल्या कुटुंबीयांनी जवळ असलेल्या लाकडी काठ्यांचा आधार देत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ प्रसादच काठीच्या सहाय्याने काठावर आला. उर्वरित तिघेजण पाण्यात बुडाले.
या प्रकाराची माहिती गावात मिळाल्यावर असंख्य ग्रामस्थ घटनास्थळी जमले. त्यांनी या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. काही तासांनी तिघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात सापडले. पोलीस पाटील, अजित गोपाळ मोहिते यांनी देवरूख पोलिसांकडे माहिती दिली. पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी तिघांचेही मृतदेह संगमेश्वरात नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य रोहन बने, लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव, सरपंच संतोष सावंत दींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात हातभार लावला. पती आणि मुलाला डोळ्यादेखत बुडताना पाहण्याचे दुर्भाग्य जनार्दन यांच्या पत्नीला सहन करावे लागले. तिघेही बुडाल्यानंतर ते जिवंत असतील, अशी त्यांना आशा होती. मात्र काहीच तासात तिघांचेही मृतदेह बाहेर काढल्यावर त्यांनी फोडलेल्या हंबरड्याने सर्वांचे काळीज हेलावून टाकले.