Menu

देश
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानसिक पराभव मान्य -राज ठाकरे

nobanner

पाच वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचार संपताना झालेल्या पत्रकार परिषदेला आलेच कशाला? जर अमित शाह हेच सगळं बोलणार होते तर मग मोदींनी गेलेच का? त्यांनी मानसिक पराभव मान्य केला आहे असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. एवढंच नाही तर पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी एवढं का घाबरतात? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या मोदींचा मानसिक पराभव झाल्याचीही टीका त्यांनी केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये लोकांचे बोलणे ऐकण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही असाही आरोप राज ठाकरेंनी केला. मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना का घाबरतात याचं उत्तरही त्यांनी पत्रकारांना द्यावं अशीही मागणी राज ठाकरेंनी केली आहे. ज्या पत्रकार परिषदेत मोदी बोललेच नाहीत त्याबद्दल आपण न बोललेलंच बरं असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतके दिवस दादागिरी केली, ती दादागिरीच त्यांना भोगावी लागणार आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेने एकही उमेदवार उभा केला नाही. मात्र महाराष्ट्रात गाजल्या त्या राज ठाकरेंच्या १० प्रचारसभा. कारण मोदी आणि शाह यांना हटवा हे सांगत त्यांनी प्रचार केला. या दोघांच्या हातून देश सोडवण्याची गरज आहे असं मत त्यांनी आपल्या प्रत्येक प्रचारसभेत व्यक्त केलं. त्यामुळे उमेदवार उभा न करताही चर्चा रंगली ती मनसेच्या सभांची. रविवारी लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. त्याआधी शुक्रवारी भाजपाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. मात्र पंतप्रधानांनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. याच मुद्द्यावरून विरोधक त्यांच्यावर शुक्रवारपासूनच टीका करत आहेत.

आता याच पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंनीही निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायचेच नव्हते तर मग ते या पत्रकार परिषदेला का गेले होते असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. शनिवारी सकाळीही मोदींची पत्रकार परिषद म्हणजे मन की बात नाही तर मौन की बात होती असं ट्विटही राज ठाकरेंनी केलं होतं.