देश
पाणीटंचाईमुळे पुढील दीड महिना फळभाज्यांचे दर तेजीत
उन्हाचा वाढता कडाका तसेच ग्रामीण भागात असलेल्या मोठय़ा प्रमाणावरील पाणीटंचाईमुळे त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या काही दिवसांपासून कमी होत चालली आहे. पुढील दीड ते दोन महिने फळभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडणार आहे.
गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची झळ फेब्रुवारी महिन्यापासून जाणवायला लागली होती. यंदा हवामानातील बदल तसेच पाणीटंचाईमुळे फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे फळभाज्या सुकल्या आहेत आणि त्यांच्या प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. चांगल्या प्रतीच्या फळभाज्यांची आवक कमी होत चालली असून दर तेजीत आहेत.
पुणे विभागातील सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ातून होणारी फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे गेले तीन ते चार आठवडे मार्केटयार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक १४० ते १५० ट्रक एवढी होत आहे. नेहमीच्या तुलनेत ही आवक कमी आहे, असे घाऊक बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पावसाळा सुरू होण्यास पंधरवडा ते महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत फळभाज्यांची आवक आणखी कमी होईल. त्यामुळे नागरिकांना फळभाज्यांसाठी अधिकचा दर मोजावा लागणयीच शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुढील दीड ते दोन महिने फळभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्यायला पाणी नसल्याने फळभाज्यांच्या लागवडीसाठी पाणी कसे उपलब्ध करायचे हा देखील प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
ऊसलागवड करणाऱ्या शेतक ऱ्यांनी उसाला पाणी देण्यातही हात आखडता घेतला आहे, असे निरीक्षण भुजबळ यांनी व्यक्त केले.
पालेभाज्या कडाडल्या
पुणे विभागातील जिल्ह्य़ातून होणारी पालेभाज्यांची आवक देखील कमी होत चालली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून पालेभाज्यांच्या भावात वाढ होत चालली आहे. किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या जुडीचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची विक्री १५ ते २० रुपये, कांदापातीच्या जुडीची २० ते २५ रुपये तसेच मेथीच्या जुडीची १५ ते २० रुपये दराने विक्री केली जात आहे. पाणीटंचाईमुळे लिंबांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. हिरव्या लिंबांची आवक होत असून पिवळ्या रसदार लिंबाच्या एका नगाची विक्री ४ ते ५ रुपये दराने केली जात आहे.
किरकोळ बाजारात फळभाज्यांचे प्रतिकिलोचे दर
बटाटा- २५-३०
कांदा- २०-२२
फ्लॉवर- ५०-६०
कोबी- ४०-५०
टोमॅटो- ३५-४०
आले- १००-१२०
लसूण- १००-१२०
मटार- १२०-१३०
वांगी- ५०-६०
भेंडी- ६०-७०
गवार- ६०-७०
मिरची- ९०-१००
ढोबळी ७०-८०
मिरची-
कारली- ७०-८०
काकडी- ४०-५०