देश
बुरख्याच्या आड फोफावतोय दहशतवाद
- 276 Views
- May 04, 2019
- By admin
- in Uncategorized, देश, समाचार
- Comments Off on बुरख्याच्या आड फोफावतोय दहशतवाद
- Edit
बुरख्याच्या आडून दहशतवाद फोफावत असल्याने यावर तत्काळ बंदी घातली पाहिजे, असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशमधील सरधनाचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे. बुरखाबंदीच्या मागणीवरुन सुरु असलेल्या वादात या विधानाने भर पडली आहे.
सोम यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून यात त्यांनी म्हटले आहे की, श्रीलंकासारख्या देशात बुरख्याच्या आडून शेकडो लोकांची हत्या केली गेली आहे. एकप्रकारे दहशतवाद बुरख्याच्या आडून फोफावत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपाचा मित्र पक्ष असणा-या शिवसेनेने देखील सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींकडे देशहितासाठी बुरखा व नकाबवर बंदी आणली जावी, अशी मागणी केली होती. तसेच, इस्लामिक दहशतवादामुळेच श्रीलंकेत ४०० जणांचा बळी गेला असल्याचेही यात म्हटले होते. शिवसेनेच्या या मागणीनंतर देशभरात बुरख्यावरून वाद निर्माण झाला. वाद चिघळताच शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली होती.
शिवसेनेच्या या मागणीचा भाजपाने विरोध केला व भारतात बुरख्यावर बंदीची काही गरज नसल्याचे सांगितले. मात्र, भाजपाने जरी बुरखा प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलेली असली तरी, त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने बुरखाविरोधी भूमिका घेत पक्षाची नाचक्की केली आहे.
संगीत सोम म्हटले आहे की, बुरख्याच्या आडून लोकशाहीवर घाला घातला जात आहे. बनावट मतदान होत आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी घुंघटबाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे नाव न घेता सोम यांनी म्हटले की, चित्रपट निर्माता व लेखकाने घुंघटवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. मी त्यांना विचारू इच्छितो की, कधी तरी घुंघटच्या आड दहशतवाद घडला का, तुम्ही हे विसरता का की तुम्ही अशा लोकांच्या सोबत उभे आहात जे दहशतवादास मदत करत आहेत. तुम्ही अशा लोकांचा प्रचार करण्यासाठी जातात.
काही दिवसांपूर्वीच जावेद अख्तर यांनी भोपाळमधील एका कार्यक्रमात बुरखा व घुंघटवर बंदी आणण्यावरून वक्तव्य केल होत. त्यांनी म्हटल होत की, श्रीलंकेत बुरख्यावर बंदी नाही आणली, तर चेहरा झाकण्यावर बंदी आणली आहे. जर भारतात बुरख्यावर बंदी आणली जात असेल तर, केंद्र सरकारने राजस्थानात मतदाना अगोदर घुंघटवर बंदी आणावी. जर घुंघट व बुरखा दोन्ही नसतील तर मला आनंदच होईल .
साध्वी प्रज्ञाचेही बंदीला समर्थन
संगीत सोम यांच्या अगोदर भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी देखील, बुरखा बंदीचे समर्थन केले होते. जर लोकशाहीला धोका किंवा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार असेल, तर परंपरांमध्ये थोडी सूट द्यायला हवी. कायदेशीररित्या बंदी आणल्या गेल्यापेक्षा, त्यांनी स्वतःच निर्णय घ्यावा. जर कोणी याद्वारे चुकीच काम करत असेल तर त्याचाच धर्म बदनाम होईल, असे प्रज्ञा यांनी म्हटले होते.
ओवैसीचा पलटवार
शिवसेनेने बुरखा बंदीची मागणी केल्यानंतर ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शिवसेनेवर पलटवार करत, घुंघटवर कधी बंदी आणणार असा सवाल केला. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत हा प्रत्येकाचा मौलिक अधिकार असल्याचे सांगितले. तसेच, घुंघट वरून बोलताना जर प्रश्न सुरक्षेचाच असेल तर साध्वी प्रज्ञा व अन्य जणांनी हल्ला करण्यासाठी काय परिधान केले होते, असा प्रश्न केला.