देश
मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमात कुटुंबीयांसहीत सहभागी होणार उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिवसेना सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधील दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
शिवसेनेचे लोकसभेत एकूण १८ खासदार आहेत तर तीन राज्यसभा सदस्य आहेत. याशिवाय महाराष्ट्रात दोन्ही पक्ष जवळपास गेल्या ३० वर्षांपासून युतीत आहेत… राज्यातही दुसऱ्यांदा या युतीला सत्ता मिळालीय. २०१४ मध्ये काही काळासाठी या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुकांत आपलं नशीब आजमावून पाहिलं. सद्य सरकारपूर्वी दोन्ही पक्ष १९९५-१९९९ दरम्यान सत्तेत होते.
शिवसेनेला सत्तेत डावललं जातंय?
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून आज शपथविधी होत आहे. शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आलंय. आज अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना थेट कॅबिनेट पद मिळणार आहे. परंतु, शिवसेनेच्या मुंबईतील खासदारांना झुकतं माप दिल्याबद्दल शिवसेनेच्या मुंबई बाहेरील खासदारांमध्ये नाराजी पसरली आहे. यातूनच शिवसेनेच्या एका खासदारानं लोकसभेतलं गटनेते पदही नाकारल्याच समजतंय.