Menu

देश
राज्यात रस्ते अपघातांचे ३ महिन्यांत ३,४३४ बळी

nobanner

राज्यात या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान झालेल्या ९ हजार ९६ रस्ते अपघातांत ३ हजार ४३४ जणांचा मृत्यू ओढवला आहे. मुंबई व पुणे शहरांत रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तुलनेत घटली असून सातारासह औरंगाबाद, लातूरमध्ये मात्र अशा मृत्यूंत वाढ झाली आहे.

या कालावधीत मुंबईत ७८२ अपघातांत ९९ जणांचा, तर पुणे शहरात २२४ अपघातांत ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत प्राणांतिक अपघातांत २० टक्क्यांनी घट झाली आहे.

राज्यातील रस्ते अपघातांत प्रत्येक वर्षी वाढच होत आहे. या अपघातांना आळा बसावा यासाठी रस्ते सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा कक्षाने सादर केलेल्या अहवालानुसार पुणे शहरातील गंभीर अपघातांचे प्रमाण ४९ टक्क्यांनी, तर ग्रामीण भागांतील अशा अपघातांचे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी झाले आहे. पुणे शहरात २२४ अपघातांत ५९ जण आणि ग्रामीण भागांत ४८१ अपघातांमध्ये २३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील गंभीर अपघातही २० टक्क्यांनी कमी झाले आहेत. सातारा जिल्ह्य़ात मात्र अशा अपघातांत ९१ टक्क्यांनी वाढ झाली असून त्याखालोखाल औरंगाबाद शहरात ८३ टक्के, लातूरमध्ये ६२ टक्के, तर भंडारात ५८ टक्के इतक्या प्रमाणात अपघात वाढले आहेत. ज्या भागांत अपघातांत वाढ झाली आहे, त्या ठिकाणी रस्ते सुरक्षा कक्षाने संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

२०१८ मधील राज्यातील अपघात

’ एकूण अपघात ३५ हजार ७१७.

’ १२ हजार ९८ अपघातांत १३ हजार २६१ जणांचे मृत्यू

’ १२ हजार ६४८ अपघातांमध्ये २० हजार ३३५ जण गंभीर जखमी. अन्य अपघात किरकोळ स्वरूपाचे आहेत.