देश
‘लॉबिस्ट’ दीपक तलवार आणि प्रफुल्ल पटेल चांगले मित्र; ईडीची न्यायालयात माहिती
आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेला हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात केला आहे. तलवार याचा एअर इंडियातील आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असून नफ्यात असलेल्या मार्गावरील एअर इंडियाची विमान सेवा बंद करुन त्या खासगी विमान कंपन्यांना देण्यात आल्याचा आरोप दीपक तलवारवर आहे.
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले, असा दावा ईडीने बुधवारी न्यायालयात केला आहे. ईडीने विशेष न्यायाधीश अनुराधा शुक्ला- भारद्वाज यांच्या न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे. या अहवालाची दखल घेत न्यायालयाने दीपक तलवारचा मुलगा आदित्य तलवार याच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
आर्थिक स्थिती नसताना ७०,००० कोटी रुपये किमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे अशा चार प्रकरणांचा ईडीकडून तपास सुरु आहे. यातील आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे या प्रकरणातील अंतिम अहवाल ईडीने सादर केला आहे. “दीपक तलवार आणि त्याच्या मुलाविरुद्धची चौकशी पूर्ण झाली आहे. पण यास्मिन कपूर (तलवारचे निकटवर्तीय), दीपा तलवार, हवाई वाहतूक खात्यातील मंत्री, अधिकारी आणि अन्य कर्मचारी यांच्याविरोधातील तपास अद्याप सुरु आहे”, अशी माहिती ईडीने दिली आहे.
“दीपक तलवारने एका आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सला भारतात मदत केली होती. तसेच एअर अरेबियासोबतच्या व्यावसायिक संबंधांची माहितीही त्याने दिली. याशिवाय दीपक तलवार हा तत्कालीन मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता. दोघेही उघडपणे भेटायचे”, असा दावा ईडीने केला आहे. ईडीच्या या दाव्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी ईडीच्या या दाव्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यापूर्वी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत प्रफुल्ल पटेल यांनी गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत.