देश
…अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार; राजू शेट्टींचा इशारा
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाळलेल्या बागेचे आठ दिवसात तातडीने पंचनामे करावे व वाळलेल्या संत्रा बागेला एक लाख रुपये तसेच टँकरने पाणी घालून जगविलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रूपये तातडीची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. या मागण्या मान्य न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दुष्काळाच्या पाहणीसाठी राजू शेट्टी सोमवारी विदर्भात होते. अमरावती जिल्ह्यातील लोणी येथे दुष्काळ पाणी परिषद पार पडली असून या परिषदेत राजू शेट्टी देखील उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजनेमध्ये वरूड तालुक्यात ५०० कोटी रूपये खर्चूनही कूपनलिकेला १२०० फुटापर्यंत पाणी लागेना मग इतका पैसा खर्च करूनही हे पाणी मुरले कुठे ?यामुळे यामध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची निवृत्त अभियंता व सुशिक्षीत बेरोजगार अभियंतामार्फत चौकशी करावी. तसेच विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाळलेल्या बागेचे आठ दिवसात तातडीने पंचनामे करावे व वाळलेल्या संत्रा बागेला एक लाख रुपये तसेच टँकरने पाणी घालून जगविलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रूपये तातडीची मदत करावी या मागण्या परिषदेत सर्वानुमते करण्यात आल्या. या मागण्याची पूर्तता केली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलतानाही राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ तीव्र आहे. त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कुठे चारा छावणींना अनुदान नाही तर कुठे जनावरांसाठी चारा, पाणी उपलब्ध नाही. लोकसभा विजयाच्या धुंदीत राज्यकर्त्यांना दुष्काळग्रस्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. दुष्काळी मदतीसाठीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दबावाला शेतकरी संघटना बळी पडणार नाही. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.