देश
जहाल नक्षली नर्मदाला अटक, गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोटाप्रकरणी होती आरोपी
रवींद्र जुनारकर, गडचिरोली
गेल्या २२ वर्षांपासून भूमिगत असलेली जहाल नक्षलवादी नर्मदा ऊर्फ अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ सुजाथक्का (६०) आणि तिचा पती किरणकुमार (५७) या दोघांना तेलंगण आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे हैदराबाद येथे अटक केली. या कारवाईने नक्षलवादी चळवळीला जबर धक्का बसला आहे.
आंध्र प्रदेशचा प्रमुख नक्षलवादी किरण कुमार ऊर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी नर्मदा अगदी सुरुवातीपासून नक्षल चळवळीत सक्रिय होते. या जोडप्यावर छत्तीसगड सरकारने २० लाखांचे इनाम जाहीर केले होते. किरण कुमार हा दंडकारण्य विशेष झोनल कमिटीचा सदस्य (डीकेएसझेडसी) असून गडचिरोली जिल्हय़ाचा प्रभारी होता. छत्तीसगड राज्यात या दोघांची दहशत होती. किरण कुमार हा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी आहे. नक्षलवाद्यांच्या (डीकेएसझेडसी) राजकीय अंग असलेल्या ‘प्रभात’ पत्रिकेचा तो संपादक होता. तांत्रिकदृष्टय़ा तो अतिशय सक्षम आहे तर त्याची पत्नी नर्मदा ही कृष्णा जिल्हय़ातील गुडिवाडा येथील रहिवासी आहे.
नर्मदाला कॅन्सरने ग्रासले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वीच किरणकुमार व नर्मदा हे दोघेही चळवळीतून बाहेर पडले. हैद्राबाद येथील कॅन्सर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी ती उपचारांसाठी रुग्णालयात गेली होती. ही माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली. त्यामुळे तेलंगणा पोलीस तिच्या मागावर होतेच. मात्र,या दाम्पत्यावर तेलंगणा राज्यात एकही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे तेलंगणा पोलिसांनी नर्मदाची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. प्राप्त माहितीच्या आधारावर गडचिरोली जिल्हय़ातील प्राणहिता पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपअधीक्षक बन्सल हैदराबाद येथे पथकासह गेले व तिथेच या दाम्पत्याला अटक केली. या संदर्भात अधिक माहितीसाठी गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन घेतला नाही. मात्र पोलीस दलातील नक्षल सेलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर नर्मदा व तिचा पती किरणकुमार यांना अटक केल्याची माहिती दिली.
कोण आहे नर्मदा?
नर्मदा ही गडचिरोली जिल्हय़ातील सर्वात जुनी व वरिष्ठ नक्षलवादी होती. गडचिरोली जिल्हय़ातील अनेक नक्षल चकमकी, हत्या, जाळपोळ, हिंसाचारात तिचा सहभाग आहे. त्यामुळे तिच्यावर दक्षिण व उत्तर गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या बहुतांश सर्वच पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. १ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसूरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. या प्रकरणातही पुराडा पोलीस ठाण्यात नर्मदावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा या तालुक्यातील बहुतांश गावात तिला ओळखले जाते. विशेष म्हणजे, रामको व शिल्पा या दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले त्या गुंटूरवाही गावातही नर्मदा सातत्याने जात होती, अशीही माहिती आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.