देश
तामिळनाडूत NIA चा छापा, संशयित श्रीलंका हल्ल्यातील सूत्रधाराचा फेसबुक फ्रेंड
आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूतील सात ठिकाणांवर छापा टाकला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित हा श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंडचा फेसबुकवर मित्र असल्याचे समोर आले आहे.
एप्रिल महिन्यात श्रीलंकेत चर्च व पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या हल्ल्यात इस्टरनिमित्त प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमलेले ख्रिश्चन व पंचतारांकित हॉटेलमधील आंतरराष्ट्रीय पाहुणे व इतर लोक यांना लक्ष्य करण्यात आले होते. या प्रकरणाचा संबंध भारताशी आहे का, याचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक श्रीलंकेत गेले होते. काही दिवसांपूर्वी हे पथक भारतात परतले होते. या पार्श्वभूमीवर एनआयएने तामिळनाडूमध्ये मंगळवारी छापा टाकला. कोईमतूर आणि अन्य भागांमधील सात ठिकाणांवर हा छापा टाकण्यात आला असून आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध किंवा समर्थक असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
श्रीलंकेतील झहरान हाशमी याच्या नेतृत्वाखालील ‘नॅशनल थौहीद जमाथ’ (एनटीजे) या संघटनेचा एप्रिल महिन्यात झालेल्या हल्ल्यात सहभाग होता. आयसिस या दहशतवादी संघटनेशी त्याचा संबंध होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एनआयएने मंगळवारी तामिळनाडूत छापा टाकला असून यातील मुख्य संशयित झहरान हाशमीचा फेसबुक फ्रेंड असल्याचे तपासातून समोर आले आहे. मोहम्मद अझरुद्दीन असे मुख्य संशयिताचे नाव असून केरळ आणि तामिळनाडूत तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे काम त्याच्याकडे होते. दक्षिण भारतात हल्ला घडवण्याचा त्याचा कट होता, असे देखील समजते.