देश
पुण्यात मृत्यूचं तांडव, भिंत कोसळून १७ मजूर ठार
पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून आणखी काही लोकही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा आणि एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
पुण्यातील बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. शुक्रवारी रात्री दिवसभर पाऊस पडत होता. त्यामुळे सोसायटीचं कपाऊंड खचलं आणि मजुरांच्या कच्च्या घरांवर ही भिंत कोसळली आणि त्यामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मोठ्या बांधकामांसाठी पोकलेन मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. त्याला लागून असलेल्या बांधकामावर काम करणाऱ्या झोपड्या होत्या. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्यायलस या सोसायटीची भिंत कोसळली. मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या.
हे बांधकाम नेमकं कोणत्या बिल्डरकडून करण्यात येत होतं त्याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पावसामुळे ही भिंत खचली आणि ती कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला. हे सगळे मजूर बंगाल आणि बिहार या ठिकाणाहून आले होते अशीही माहिती मिळाली आहे.
मृतांची नावं
१) आलोक शर्मा (वय-२८), २) मोहन शर्मा (वय-२०), ३) अजय शर्मा (वय-१९), ४) अभंग शर्मा (वय-१९), ५) रवि शर्मा (वय-१९), ६)लक्ष्मीकांत सहानी (वय-३३),७) अवधेत सिंह (वय-२२), ८) सुनील सिंग(वय-३५), ९) सोनाली दास (वय-२), १०)ओवी दास (वय-६), ११)विमा दास (वय-२८) १२) पूजा देवी(वय २८) अशी समोर आलेली नावं आहेत. एकूण पंधरा जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.