Menu

देश
बॉम्बस्फोटातल्या आरोपींना तिकीट देणं हा लोकशाहीवरचा हल्ला-शरद पवार

nobanner

मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना तिकिट दिलं जाणं ही बाब गंभीर आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर टीका केली आहे. बॉम्बस्फोटातल्या आरोपींना तिकिट देणं हा तर लोकशाहीवरचा हल्ला आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. राजकारणात किंवा समाजकारणात काम करणाऱ्या लोकांवर खटले असतात. पण लोकांच्या प्रश्नावर काढलेले मोर्चे, आंदोलनं या प्रकरणांमध्ये हे खटले असतात. मात्र खुनाचा आरोप, मालेगाव बॉम्बस्फोट खटला असे गंभीर खटले असणारेही काहीजण असे आहेत ज्यांना तिकिट मिळालं. या प्रकरणांमध्ये काहींची चौकशीही सुरू आहे तरीही तिकिट कसं दिलं जातं? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असणाऱ्या एक भगिनी आमच्या शेजारी बसणार आहेत असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अल्पसंख्यांक समाजाची मुले पकडण्यात आली. ही बाब मला समजली नाही. शुक्रवार होता. त्यात नमाज सुरु असताना त्याच समाजातील मुलं मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करतील यावर माझा विश्वास बसला नाही जे पकडले गेले त्यांची सुटका झाली पाहिजे अशीही अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. देशात सध्या सांप्रदायिक विचारांचा ज्वर पहायला मिळतो आहे. दिल्ली आणि संसदेत तो पहाण्यास मिळतो आहे, सामाजाला एकसंध न ठेवणारी विखारी पद्धत संसदेत बघायला मिळते आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला. २० वर्ष होवून गेली.बरीच स्थित्यंतरे होवून गेली. महाराष्ट्रात मंत्रिमंडळात तर गोव्यात मंत्रीमंडळात संधी मिळाली. पक्ष स्थापन झाल्यावर सत्तेत येणारा एकमेव पक्ष होता हे तुमच्यामुळे घडले असेही शरद पवार कार्यकर्त्यांना म्हणाले. राज्यात नवे आहोत, तरुण आहोत, आपल्यासाठी जो कालखंड आला तो स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचे काम आपण केले असेही शरद पवार म्हणाले.

आपल्या देशाचे पंतप्रधान गुहेत जावून बसले आणि काय संदेश दिला? विज्ञानाच्या आधारे आधुनिक विचार केला जातो मात्र आपले पंतप्रधान गुहेत जाऊन बसतात हे योग्य नाही असा टोला शरद पवार यांनी मोदी यांना लगावला. सुरुवातीला सत्ता असताना तरुण वर्ग आपल्याकडे होता. आजही नवी पिढी, तरुण किती प्रमाणात आहे.या तरुण पिढीकडे लक्ष दिले नाही त्यांची काळजी नाही घेतली नाही तर काय होईल याचा विचार पक्षात व्हायला हवा असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.