देश
भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
गुजरातच्या नरोदा येथे भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कुबेरनगर परिसरात हा प्रकार घडला.
स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या समस्येवर जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या नीतू तेजवानी नरोदामधील भाजपचे आमदार बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. विभागातील घरे आणि कार्यालयांतील कापलेल्या नळजोडण्या दोन दिवसांत पुन्हा दिल्या नाहीत तर, कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा त्यांनी थवानींना दिला.
यानंतर बलराम थवानी यांनी माझे काहीही ऐकून न घेताच माझ्या कानशिलात लगावली. त्यांच्या समर्थकांनी आम्हाला तेथून जबरदस्तीने हटवायला सुरुवात केली. या झटापटीत मी खाली पडले तेव्हा थवानी यांनी मला लाथा मारायला सुरुवात केली. या लोकांनी माझ्या नवऱ्यालाही मारले. त्यामुळे भाजपच्या राज्यात महिला कशा सुरक्षित राहणार, एवढाच प्रश्न मला पंतप्रधान मोदींना विचारायचा असल्याचे तेजवानी यांनी म्हटले.