Menu

देश
मुंबई, कोकणात आजही ‘कोसळधार’, हवामान विभागाचा अंदाज

nobanner

शुक्रवारी(दि.28) सकाळी मुंबई आणि उपनगरात सुरु झालेल्या पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही. अशातच आजही मुंबई-ठाण्यातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. याशिवाय मुंबईच्या समुद्रात मच्छिमारांना न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईच्या समुद्रात सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी ४.४ मीटरच्या लाटा उसळणार असल्याने समुद्रात मच्छिमारांना न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसाने जून महिन्यातील सरासरी गाठली आहे. जूनमध्ये मुंबईत ९७ टक्के पावसाची नोंद झाली असून गेल्या दहा वर्षातील जूनमधील सर्वाधिक पावसाची दुसऱ्यांदा नोंद झाली आहे. पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रीय झाला आहे. हवेचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळेच मुंबई, ठाणे आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात शहरात 127 मिमी, पश्‍चिम उपनगरात 170 मिमी व पूर्व उपनगरात 197 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईप्रमाणेच पालघरमध्येही पावसाने चांगला जोर धरल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत.

ठाण्यात पावसाचा जोर, दोघांचा मृत्यू

ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या शहरांबरोबरच जिल्ह्य़ाच्या अनेक भागांमध्ये शनिवारी दुपापर्यंत पावसाचा जोर कायम होता. या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ४८ तक्रारी आल्या. जोरदार पावसामुळे ठाणे शहरात गेल्या ३२ तासांत ३९ वृक्ष उन्मळून पडले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. मध्ये रेल्वे १५ ते २० मिनीटे उशिराने धावत होती. ठाण्याच्या कोलबाड भागात नागेश निरंगे (४६) यांचा शेलार पाडा भागात विद्युत वाहिनीवर पडलेले झाड बाजूला करताना, तर अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडय़ात विष्णू सोलंकी (२१) या रिक्षाचालकाचा विजेच्या धक्क्य़ाने मृत्यू झाला.

भाईंदरमधील काशिमीरा येथे तबेल्यात काम करणाऱ्या हरिवंश अभयराज यादव यांचा शुक्रवारी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मात्र मृत्यूचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

वागळे ईस्टेट, वर्तकनगर, कोपरी, खोपट, रघुनाथ नगर, नौपाडा, माजीवडा, खारकर आळी, तीनहात नाका, घोडबंदर तर कळव्यामधील पारसिक नगर, तसेच मुंब्रा येथील एकता नगर आणि शीळ गाव या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीची गती मंदावली. ठाणे स्थानक परिसर, नितीन जंक्शन या परिसरात सकाळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळे शनिवारी पहाटे लोकमान्य नगर, कोपरी, कळवा भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता.

तीन हात नाका, वर्तकनगर, रघुनाथ नगर, नौपाडा, कोपरी, पाचपाखाडी आणि राबोडी भागांत झाडे उन्मळून पडली. पाचपाखाडी येथे झाड पडून एका दुचाकीचे नुकसान झाले. राम मारूती रोडपासून मासुंदा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी मोठा वृक्ष कोसळला. परिणामी हा मार्ग काही काळ वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. खोपट येथील आंबेडकर रोडजवळ एका नाल्याजवळील संरक्षक भिंत कोसळली. घोडबंदर येथील आनंद नगर भागात रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करण्यात अडथळा निर्माण झाला.

घोडबंदर, भिवंडीत विजपुरवठा खंडीत

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे घोडबंदर येथील वाघबीळ भागातील कॉसमॉस रिजन्सी संकुलाचा वीजपुरवठा शुक्रवार सकाळपासून खंडीत झाला होता. महावितरणाच्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने संकुलातील १८५ कुटुंबांना त्रास सहन करावा लागला. संकुलातील विद्युतपुरवठा शनिवारी रात्री सुरळित झाला. त्याचबरोबर भिवंडी शहरीभागासह ग्रामीण भागातही काही काळ वीजपुरवठा खंडीत झाल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

मुंबई-ठाणे पाऊसनोंद : सांताक्रूझ येथे दुपारी ४.३० वाजेपर्यंत ६९.२ मि.मी., तर कुलाबा येथे ४६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात गेल्या २४ तासांत २९१.७ मिमी पावसाची नोंद झाली

मदतीला धावले पण..

ठाण्यातील कोलबाड भागात उन्मळून पडलेल्या झाडावरील विद्युत वाहिनी हटवण्यासाठी गेलेल्या राबोडी येथील रॉबर्ट चाळीतील रहिवासी नागेश निरंगे यांचा शुक्रवारी मध्यरात्री वीजेच्या धक्क्य़ाने मृत्यू झाला. कोलबाड येथील शेलार पाडा भागातील विद्युत वाहिनीवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी निरंगे झाडाजवळ गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दुसरी दुर्घटना अंबरनाथची आहे. तेथील दुर्गादेवी पाडय़ात राहणारे रिक्षाचालक विष्णू सोलंकी शुक्रवारी रात्री १०च्या सुमारास शिवाजी चौकातील रिक्षा थांब्यावर प्रवाशांची वाट पाहत होते. त्याचवेळी एक झाड रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा थांब्याच्या लोखंडी छप्परावर कोसळले. त्यामुळे तेथील विद्युत वाहिन्या तुटल्या. विद्युत प्रवाह लोखंडी खांबात उतरल्याने धक्का लागून सोलंकी जखमी झाले. त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वीज पडून राज्यात पाच मृत्युमुखी

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्य़ातील उमरी तालुक्यातील हातणी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्य़ातील नेर, दिग्रस आणि उमरखेड तालुक्यांत वादळी पावसात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तर बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यात विहीर खचून एकाचा मृत्यू झाला.