Menu

देश
रक्तसंकलनाबाबत देशात महाराष्ट्र स्वयंपूर्ण

nobanner

रक्तसंक्रमणाची गरज भागवण्यासाठी लोकसंख्येच्या किमान एक टक्का व्यक्तींनी रक्तदान करणे आवश्यक आहे. सन २०१८ या वर्षांत महाराष्ट्रात १६ लाख ५६ हजार युनिट रक्ताचे संकलन झाले असून त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळणे शक्य झाले. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र रक्तसंकलनाच्या बाबतीत संपूर्णत: स्वयंपूर्ण असल्याचे चित्र आहे.

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे१४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो. ‘सर्वाना सुरक्षित रक्त’ ही यंदाच्या जागतिक रक्तदाता दिवसाची संकल्पना आहे. या पाश्र्वभूमीवर स्टेट ब्लड ट्रान्सफ्यूजन काऊन्सिलतर्फे रक्तसंकलनासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख एवढी आहे. त्याच्या एक टक्का म्हणजे ११ लाख २३ हजार युनिट रक्तसंकलन राज्याला स्वयंपूर्ण बनवते, असे मानल्यास २०१८ या वर्षी तब्बल १६ लाख ५६ हजार युनिट एवढे रक्त संकलित झाले. त्यामुळे महाराष्ट्राची रक्त संकलनातील परिस्थिती समाधानकारक असल्याचे एसबीटीसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरूण थोरात म्हणाले,की पुण्यात २०१८ या वर्षांत तीन हजार १११ रक्तदान शिबिरे झाली. त्यात दोन लाख २० हजार ७८४ युनिट रक्ताचे संकलन झाले. पुणे विभागात (पुणे, सातारा आणि कोल्हापूर) सहा हजार १९ शिबिरे झाली. त्यात तीन लाख ८३ हजार युनिट रक्ताचे संकलन झाले. रक्त आणि त्यातून वेगळे केलेले रक्तघटक यांमुळे त्याचा लाभ लाखो रुग्णांना मिळाला. सन २०१८ या वर्षांत मुंबईमध्ये तीन हजारपेक्षा जास्त रक्तदान शिबिरे झाली आणि त्यातून दोन लाख ९८ हजार युनिट रक्ताचे संकलन झाले. हे चित्र समाधानकारक आहे. ते तसेच कायम राहाण्यासाठी स्वयंप्रेरणेतून रक्तदान करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत राहणे महत्त्वाचे आहे.

रक्तदान कोणी करावे

* संसर्गजन्य आजार नसलेले सर्व निरोगी नागरिक रक्तदान करू शकतात.

* अठरा ते पासष्ट वर्षे वय आणि पन्नास किलोपेक्षा अधिक वजन असलेल्यांनी रक्तदान करावे.

* १२.५ टक्के हिमोग्लोबिन असलेले नागरिक रक्तदान करू शकतात.
* टॅटू केला असल्यास किमान नऊ महिने रक्तदान करू नये.

* धूम्रपान, मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी रक्तदान करू नये.

रक्तदानाचे फायदे

* रक्तदान केल्याने शरीरात सातत्याने नवीन रक्त तयार होते.

* रक्तदान केल्यामुळे ताकद कमी होत नाही.

* रक्तदान केल्याने शरीरातील अतिरिक्त प्रमाणातील लोह कमी होते.

* यकृताचे आरोग्य चांगले राहते.