Menu

अपराध समाचार
सायकल प्रकल्पात भ्रष्टाचार?

nobanner

प्रकल्प राबवणारी कंपनी ११४ कंपनी कमवणार; राष्ट्रवादीची ठाणे महापालिकेवर टीका

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये सायकल प्रकल्प राबविणारी कंपनी प्रकल्पावर पाच कोटी रुपये खर्च करून सायकल भाडे आणि जाहीरातीच्या माध्यमातून ११४ कोटी रुपयांचा नफा कमविणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच या प्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचाही आरोप करत या घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडीवर मात आणि पर्यावरण संवर्धनाच्या गोंडस नावाखाली ठाण्यात सुरू झालेल्या सायकल प्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप परांजपे यांनी यावेळी केला. सायकल प्रकल्पाला विनामूल्य जागा देण्याचा प्रस्ताव सर्वसाधरण सभेने फेटाळून लावल्यानंतरही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन ठामपाच्या मालकीची सुमारे ७ हजार ५६४ चौरस फुटांची जागा नागपूरस्थित साइन पोस्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीला दिली आहे. त्याविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करुन त्यांचा आवाज दडपण्यात आला आहे, असा गौप्यस्फोट आनंद परांजपे यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावे जर गैरकृत्य केले जात असेल मुख्यमंत्र्यांनीच या घोटाळ्याची पारदर्शक चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

या कंपनीला शहरातील मोक्याच्या ५० ठिकाणांवर सायकल स्थानकांसाठी जागा आणि त्यावरील जाहिरातीचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. साधारणपणे एका ठिकाणी जाहिरातकराच्या माध्यमातून ठाणे पालिकेला २२ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न दरमहा मिळते. त्यानुसार १५ वर्षांत २० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर महापालिकेने पाणी सोडले आहे. त्यापाठोपाठ खेवरा सर्कल येथील तळ आणि पहिल्या मजल्याची जागा या कंपनीला सायकल प्रकल्पासाठी विनामुल्य दिली जाणार आहे. त्यामुळे पालिकेचे सुमारे ६८ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. ५० ठिकाणी प्रत्येकी १२ या प्रमाणे ६०० सायकलवर ३ हजार रुपयांप्रमाणे १८ लाख आणि सुशोभिकरणाचे प्रत्येकी दहा लाख या प्रमाणे केवळ ५ कोटी रुपये कंपनी खर्च करणार आहे. तर सायकल भाडे आणि जाहिरातीच्या माध्यमातून या कंपनी किमान ११४ कोटी रुपयांचा नफा कमविणार आहे, असा दावाही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेदरम्यान आनंद परांजपे आणि नगरसेवक सुहास देसाई यांनी सायकल आणून ती आयुक्त जयस्वाल यांना देणार असल्याचे स्पष्ट केले.

‘ठरावाची अंमलबजावणी रोखा’

ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना लाचार नसेल तर त्यांनी हा ठराव नाकारला पाहिजे. महापौर मिनाक्षी शिंदे यांनी या ठरावाची अंमलबजावणी रोखली पाहिजे, असेही परांजपे यांनी सांगितले. शिवसेनेने अशा भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याऐवजी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल दिली असती तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांचे स्वागतच केले असते, असेही त्यांनी सांगितले.