Menu

अपराध समाचार
‘हेल्मेट काढ स्पर्श करता येत नाहीये’, बहाणा करत तरुणीचा प्रियकरावर अॅसिड हल्ला

nobanner

राजधानी दिल्लीत तरुणीने लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमधील विकासपुरी परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी तरुणी प्रियकरासोबत दुचाकीवरुन प्रवास करत होती. यावेळी तिने प्रियकराला आपण व्यवस्थित स्पर्श करत नसल्याचं कारण सांगत हेल्मेट काढायला सांगितलं. यानंतर काही वेळाने तरुणीने प्रियकरावर अॅसिडने हल्ला केला.

११ जून रोजी पोलिसांनी एका जोडप्यावर अॅसिड हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून तपासणी केली असताना तरुणी हातावर काही हलक्या जखमा झाल्या असल्याचं निदर्शनास आलं. तर दुसरीकडे तरुणाचा चेहरा, गळा आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या होत्या.

हल्ला नेमका कोणी केला हे पोलिसांना कळत नव्हतं. दोघांनी आपण दुचाकीवरुन जात असताना कोणीतरी अॅसिड हल्ला केल्याचं चौकशीत सांगितलं होतं. पण जेव्हा तरुणाने प्रेयसीने हेल्मेट काढायला सांगितलं होतं अशी माहिती दिली तेव्हा मात्र पोलिसांना तिच्यावर संशय आला. अनेक तास चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला.

‘दोघे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. पण काही दिवसांपूर्वी तरुणाने आपल्याला हे नातं संपवायचं असल्याचं सांगितलं होतं. प्रियकर लग्नासाठी टाळाटाळ करत असल्यानेच तरुणीने त्याचा चेहरा खराब करायचा ठरवलं होतं’, अशी माहिती पोलीस उपायुक्त (पश्चिम) मोनिका भारद्वाज यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.